अकिरा : दीर्घकालीन गुंतागुंतीची कथा
By Admin | Published: September 3, 2016 07:32 AM2016-09-03T07:32:52+5:302016-09-03T07:40:51+5:30
अय्याश, मवाली, रोडरोमिओ मुलांना त्याने छेडलेल्या मुलीनेच मार मार मारले की जितका आनंद होतो, तितका आनंद हिरोने मारून नाही होत, हे अकिरा पाहून जाणवते
- जान्हवी सामंत
चित्रपट परीक्षण: अकिरा
कलाकार: सोनाक्षी सिन्हा, अनुराग कश्यप, कोंकणा सेन शर्मा.
दिग्दर्शक: ए. आर. मुरगादास
दर्जा: ***1/2
काही म्हणा अय्याश, मवाली, रोडरोमिओ मुलांना त्याने छेडलेल्या मुलीनेच मार मार मारले की जितका आनंद होतो, तितका आनंद हिरोने मारून नाही होत, हे अकिरा पाहून जाणवते. अॅसिड हल्ला करणाऱ्या मुलावर जेव्हा अॅसिड हल्ला होतो तेव्हा खरा न्याय झाल्यासारखे वाटते. मुलीने जर परत ‘ईट का जवाब पत्थर से’ दिला तर जगामध्ये खूप परिवर्तन येईल, असा या चित्रपटाचा संदेश आहे. पण हा संदेश द्यायला अकिराला खूप लांब आणि गुंतागुंतीची गोष्ट सांगावी लागते.
अकिरा हा चित्रपट एका असाधारण मुलीची गोष्ट आहे. एका मूकबधिर माणसाला झालेली मुलगी, अकिरा लहानपणी एक अॅसिड हल्ल्याची घटना पाहते. न्याय मिळवून देण्याकरिता ती त्या गुन्हेगारांची ओळख करून त्यांना शिक्षा देण्यास भाग पाडते. मुलींवर होणाऱ्या वारंवार हल्ल्यांना सामोरे जायला, अकिराचे वडील तिला स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी पाठवितात. थोड्याच दिवसात अकिरा स्वसंरक्षणात पारंगत होते आणि अॅसिड हल्ल्यापासून एका मुलीला वाचविते. अॅसिड मुलावर पडते म्हणून अकिराला काही वर्षे रिमांड होममध्ये जायला लागते. बाहेर येऊन अकिरा आपल्या भावाबरोबर मुंबईला कॉलेजला जाते. पण मुंबईमध्येही ती एका खोट्या पोलीस केसमध्ये नकळत फसते. त्या केसमधल्या बदमाश आणि अय्याश पोलीस अधिकारी राणे (अनुराग कश्यप) आणि त्याच्या टोळीला ती कशी पकडून देते ही या चित्रपटाची कथा आहे.
या चित्रपटाची अडचण म्हणजे कथा सोप्या पद्धतीने सांगितली नाही. कथा खूप घुमवून आणि फिरवून आडवळणी पद्धतीने सांगितली आहे. जसजशी कथा पुढे सरकते तसतशी ती अजून समजण्यास कठीण होते. पहिला भाग खूप रंगला आहे. अकिराचे धैर्य, पोलीस अधिकारी राणेचा उन्मत्तपणा, पोलीस अधिकाºयाची अरेरावी ही चांगल्यारीत्या सादर केली आहे. पण पहिला भाग जितका आश्वासक आहे, तितकाच दुसरा भाग अगदी रटाळ आहे. एका विशिष्ट टोकावर चित्रपट अगदी स्वत:मध्ये गुंतून जातो. अकिरावर झालेला अतोनात अन्याय बघून आधी वाईट वाटते, पण नंतर कंटाळा येतो. पटकथेची आणखी एक अडचण म्हणजे अकिराची भूमिका इतकी धाडसी असूनही शेवटपर्यंत ती नुसतीच प्रतिक्रियात्मक असते. त्यामुळे चित्रपटाचा शेवट फिका होऊन जातो.
सोनाक्षीने आपली भूमिका सक्षमरीत्या सांभाळलीय. अनुराग कश्यप क्रूर खलनायक वाटतो. त्याच्या टोळीमधील सगळ्या मराठी कलाकारांनी विशेषत: लोकेश गुप्ते, नंदू माधव आणि उदय सबनीस यांनी उत्कृष्ट काम केले आहे.
हॉलिवूड चित्रपट किल बिलच्या धाटणीवर अकिरा बनविला आहे. मारहाण, नृत्य, पार्श्वसंगीत, धार्मिक चित्रपट फारगोप्रमाणे गर्भवती असलेली अधिकारी कोंकणाची भूमिका, अगदी उमा थुरमनसारखी केसांची स्टाईल सोनाक्षीने केली आहे. पण तशा अभिनेत्री केंद्रित चित्रपटासारखी स्टाईल आणि वेग अकिराला नाही. या चित्रपटाच्या बाबतीत वेगळ्या संदर्भामध्ये बघणे फार जरुरीचे आहे. अॅसिड हल्ला करणारा तरुण असो की भ्रष्ट पोलीस अधिकारी, महाविद्यालयात रॅगिंग करणारा तरुण किंवा एसीपी राणे याचे आपल्या सहकारी महिलांशी चेष्टा करून बोलणे, येता-जाता महिला पोलीस अधिकाऱ्याना वाईट नजरेने पाहणे हे सगळे आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक आहेत. अकिराची लढाई या संस्थेशी आहे. तिच्या लढाईमध्येही तिला एक तृतीयपंथी मदत करतो. पोलीस अधिकारी रबिया शेख ही अकिराची मदत करत असली तरीही तिला पोलीस आयुक्तांच्या सूचनांचे पालन करावे लागते, सगळे जाणूनही ती त्यांच्या सूचनांचे उल्लंघन करीत नाही, ही बाब पुरुषप्रधान प्रथेसंदर्भात खूप काही सांगून जाते.