अक्षय कुमार आणि रजनीकांतमध्ये होणार फुटबॉल सामना
By Admin | Published: March 18, 2016 05:22 PM2016-03-18T17:22:28+5:302016-03-18T17:31:30+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्यामध्ये फुटबॉल सामना होणार आहे
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १८ - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्यामध्ये फुटबॉल सामना होणार आहे. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु स्टेडिअमवर हा हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. दोघेही फुटबॉल खेळणार असले तरी हा रिअल नसून रिल सामना असणार आहे. रजनीकांत आणि अक्षय सध्या 'रोबोट 2' चं शुटींग करत आहेत. त्याच चित्रपटातील फुटबॉलचा सिक्वेन्स जवाहरलाल नेहरु स्टेडिअमवर शुट केला जाणार आहे.
या फुटबॉल सामन्याची थीम मुंबई विरुद्ध चेन्नई अशी असणार आहे. स्टेडिअममध्ये काही ठिकाणी कोप-यात हे पोस्टर पाहायला मिळत आहेत. चाहते मोठ्या संख्येने गर्दी करतील यासाठी शुटबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये जाणा-या लोकांनाही आत जाऊ दिल जात नाही आहे, जेणेकरुन आतमध्ये उभारण्यात आलेल्या सेटची माहिती बाहेर येऊ नये.
40 दिवसांसाठी ही शुटींग चालणार आहे. चाहत्यांनी रजनीकांत आणि अक्षय कुमारला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून दोघेही शुटींगमध्ये सहभागी होणार आहेत. रोबोट 2 मध्ये अक्षय कुमार व्हिलनच्या भुमिकेत असल्याने आणि प्रथमच रजनीकांत आणि अक्षय कुमार एकत्र काम करत असल्याने चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चाहते आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. याअगोदरही या चित्रपटातील फाईटच्या एका दृश्यावर तब्बल वीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती.