जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 04:22 PM2024-10-18T16:22:48+5:302024-10-18T16:24:42+5:30
अक्षय कुमार-आर.माधवन यांच्या आगामी सिनेमाची शानदार घोषणा झालीय. या सत्य घटनेवर आधारीत असणार सिनेमा (akshay kumar)
बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. याशिवाय 'रेहना है तेरे दिल मे' सिनेमातून सर्वांच्या 'दिल'मध्ये स्वतःची छाप पाडणारा अभिनेता आर.माधवन. या दोघांना एका सिनेमात पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणी असणार यात शंका नाही. हीच पर्वणी रुपेरी पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. आर.माधवन आणि अक्षय कुमार या दोघांच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय. करण जोहर या सिनेमाचा निर्माता आहे.
या सिनेमात दिसणार अक्षय-माधवन
आज शुक्रवारी निर्माते करण जोहर यांनी एका अनटायटल सिनेमाची घोषणा केलीय. सोशल मीडियावर करण जोहरने 'धर्मा प्रॉडक्शन'च्या आगामी सिनेमाची घोषणा केलीय. "आजवर कधीही न सांगितलेली कहाणी. आजवर कधीही न सांगितलेलं सत्य." असं कॅप्शन देऊन या सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. करण सिंह त्यागी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. सिनेमात अक्षय कुमार, आर.माधवन आणि अनन्या पांडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत. १४ मार्च २०२५ ला सिनेमा रिलीज करण्यात येणार आहेत.
या सत्य घटनेवर आधारीत असणार सिनेमा
जालियनवाला बागेत ब्रिटीशांनी जो हल्ला केला ती घटना या सिनेमाची पार्श्वभूमी आहे. त्यावेळी भारतातील सी. शंकरन नायर यांनी ब्रिटीश साम्राज्याविरोधात केलेली कायदेशीर लढाई या सिनेमात दिसणार आहे. रघु पलट आणि पुष्पा पलट लिखित ‘द केस दॅट शूक द एम्पायर' या पुस्तकावर हा सिनेमा आधारीत असणार आहे. जालियनवाला बाग हत्याकांडच्या वेळी पंजाबमधील लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओ'डायर यांच्या कार्यकारी परिषदेने त्यांचे माजी सदस्य चेत्तूर शंकरन नायर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या सिनेमात कोर्टरुम ड्रामा दिसणार असून अक्षय कुमार सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारणार असल्याची शक्यता आहे.