अक्षय कुमार सांगतोय, हे आहे आमच्या सुखी संसाराचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 05:34 PM2019-03-06T17:34:23+5:302019-03-06T17:35:22+5:30
अक्षय आणि ट्विंकल यांच्या नात्याची नेहमीच मीडियात चर्चा होते. बॉलिवूडमधील क्यूट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते.
१७ जानेवारीला अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला १८ वर्षं पूर्ण झाले. अक्षय आणि ट्विंकल हे बॉलिवूडमधील आदर्श जोडपे मानले जाते. दोघांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. आरव विदेशात शिकतो आहे तर नितारा अद्याप बरीच लहान आहे. अक्षय आणि ट्विंकलच्या करिअरबद्दल बोलायचे तर ट्विंकलने बरसात या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने बादशाह, मेला यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण अभिनयक्षेत्रात आपले करियर होणे कठीण आहे याची जाणीव झाल्याने तिने अभिनयाला रामराम ठोकला. ‘मेला’सारखा सुपर फ्लॉप सिनेमा दिल्यानंतर तिने अभिनय सोडणेचं योग्य समजले आणि लेखिका बनण्याचा निर्णय घेतला. याउलट अक्षय गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक अॅक्शन चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर त्याने अनेक हिट कॉमेडी चित्रपट दिले. गेल्या काही वर्षांपासून तो सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांवर भर देत आहे. आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारची गणना केली जाते.
अक्षय आणि ट्विंकल यांच्या नात्याची नेहमीच मीडियात चर्चा होते. बॉलिवूडमधील क्यूट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. आज लग्नाला इतके वर्षं झाल्यानंतर तुमच्या सुखी संसाराचे रहस्य काय? याविषयी अक्षयला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आले होते. त्यावर अक्षय सांगतो, आम्ही दोघे एकमेकांच्या कामात कधीच ढवळाढवळ करत नाही. आम्ही एकमेकांच्या कामाचा आदर करतो. एकमेकांना स्पेस देतो. मुलांच्या संगोपनात देखील दोघांचा वाटा तितकाच असतो. कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि त्यानंतर त्यांना काय निर्णय घ्यायचा हे त्यांच्यावर सोपवतो. माझ्या वडिलांनी मला सांगितले होते की, दारू प्यायची असेल तर माझ्यासमोर प्यायची... लपून प्यायची नाही. माझ्या वडिलांनी दिलेल्या याच स्वातंत्र्यामुळे अशी कोणती गोष्ट करावी अशी मला कधीच वाटली नाही आणि त्याचमुळे मी व्यसनांपासून दूर राहिलो. माझ्या मुलांना देखील व्यसनांपासून दूर राहावे यासाठी मी देखील त्यांना त्याचप्रकारे शिकवण दिली आहे.