अक्षय कुमार सांगतोय हे माझे पहिले प्रेम

By प्राजक्ता चिटणीस | Published: March 6, 2019 05:12 PM2019-03-06T17:12:37+5:302019-03-06T17:13:32+5:30

अक्षयचा केसरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचसोबत तो आता वेबसिरिजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे.

Akshay Kumar Said I m first stuntman then actor | अक्षय कुमार सांगतोय हे माझे पहिले प्रेम

अक्षय कुमार सांगतोय हे माझे पहिले प्रेम

googlenewsNext
ठळक मुद्देखिलाडी या माझ्या चित्रपटातील स्टंटची प्रचंड चर्चा झाली होती. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना मी स्थिरावलो. यामुळे मी पहिला स्टंटमन आणि नंतरच अभिनेता आहे असे सगळ्यांना आवर्जून सांगतो.

आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारची गणना केली जाते. त्याचा केसरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचसोबत तो आता वेबसिरिजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. त्याच्या या नवीन प्रोजेक्टविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

अक्षय तुझ्या करियरला आज अनेक वर्षं झाली आहेत. तुझ्यासाठी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. तुझ्या या प्रवासावर चित्रपट बनवण्याचा अथवा पुस्तक लिहिण्याचा कधी विचार केला आहेस का?
मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागला हे खरे आहे. पण एक सामान्य माणूस त्याच्या आयुष्यात जितका संघर्ष करतो, तितकाच मी केला आहे. केवळ माझे भाग्य चांगले असल्याने मला यश मिळाले. माझ्या संघर्षावर चित्रपट बनावा असा संघर्ष माझ्या वाट्याला आला नाही. त्यामुळे त्यावर चित्रपट बनवण्यासारखे अथवा त्यावर पुस्तक लिहिण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही.  

केसरी या चित्रपटात एक ऐतिहासिक घटना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, या चित्रपटाच्या भूमिकेसाठी तू कशाप्रकारे तयारी केली?
आपल्या भारतातील अनेक ऐतिहासिक घटना आजच्या पिढीला माहीत नाहीयेत. मला वाटते की, चित्रपटाच्या माध्यमातून हाच इतिहास दाखवण्यात आला तर तो अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. केसरी या चित्रपटात दहा हजार सैनिक समोर असताना केवळ २१ जणांनी मिळून कशाप्रकारे लढा दिला ही खरी गाथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा इतिहास मला लोकांपर्यंत पोहोचवता आला याचा मला आनंद होत आहे. हा चित्रपट मी आपल्या सैनिकांना समर्पित केला आहे. या चित्रपटातील माझा लूक खूपच वेगळा आहे. या चित्रपटात मी पगडी घातलेली दिसणार आहे. एकदा तुम्ही पगडी डोक्यावर घातल्यानंतर तुमच्यावर एक प्रकारची जबाबदारी येते. तुमचा कणा ताठ होतो, मान उंचावते, नजर स्थिर होते, ती एक वेगळीच भावना असते असे मला वाटते. चित्रपटात मी घातलेली पगडी ही दीड किलोची होती. ती घालून लढाई करणे, तलवारी उचलणे हे सोपे नव्हते आणि त्यात खूप ऊन असायचे. चित्रीकरण करताना धुळ डोळ्यांत जायची या सगळ्यात चित्रीकरण करणे हे एक आव्हान होते. 

तू आणि स्टंट यांचे खूप जवळचे नाते आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत देखील तू स्टंट करताना दिसलास, त्याविषयी काय सांगशील?
स्टंट करताना मी खूप काळजी घेतो. स्टंट मी एकटा करत असलो तरी त्याच्यामागे अनेकांची मेहनत असते. माझा स्टंट सुरू असताना दोनशे ते तीनशे लोकांची टीम तिथे उपस्थित असते. स्टंट करणे हे सोपे नाहीये. त्यासाठी खूप तयारी करावी लागते. आम्ही अभिनेते स्टंट करतो, त्यामुळे आपण पण हे स्टंट करावेत असे सामान्य लोकांना वाटते. पण हे स्टंट कोणीही घरात करण्याचा प्रयत्न करू नका असे मी सगळ्यांना सांगू इच्छितो. फिअर फॅक्टर करताना देखील मी हीच गोष्ट अनेकवेळा सांगायचो. स्टंट करताना रिस्क करते. पण तरीही पैशांसाठी अनेक स्टंटमन हे काम करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे. खिलाडी या माझ्या चित्रपटातील स्टंटची प्रचंड चर्चा झाली होती. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना मी स्थिरावलो. यामुळे मी पहिला स्टंटमन आणि नंतरच अभिनेता आहे असे सगळ्यांना आवर्जून सांगतो.

तू आता डिजिटल विश्वात प्रवेश करत आहेस, या माध्यमात आणि चित्रपट या माध्यमात काही फरक जाणवला का?
द एन्डमध्ये मी प्रेक्षकांना अॅक्शन करताना दिसणार आहे. डिजिटलमध्ये काम करताना माध्यम बदलत असले तरी अभिनय आणि कॅमेरा या दोन गोष्टींमध्ये काहीही बदल होत नाही. केवळ या माध्यमाची कथा सांगण्याची पद्धत वेगळी आहे. तसेच डिजिटल माध्यमामध्ये दिवसाला सहा-सात मिनिटांचे तरी चित्रीकरण केले जाते. त्या तुलनेत चित्रपटांचे काम संथ असते. मला या माध्यमाकडून खूप काही शिकायला मिळेल याची मला खात्री आहे. 



 

Web Title: Akshay Kumar Said I m first stuntman then actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.