अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज' ऑस्करसाठी पाठवणार, राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त निर्मात्यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 04:13 PM2023-10-13T16:13:05+5:302023-10-13T16:17:24+5:30
खिलाडी अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज' हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवणार आहेत.
खिलाडी अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज' हा चित्रपट 6 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. शिवाय, प्रेक्षकांनीही सिनेमाचं भरभरु कौतुक केलयं. आता अक्षय कुमारच्या 'मिशन राणीगंज' बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
'मिशन राणीगंज'चे निर्माते अक्षय कुमारच्या चित्रपटाला जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवणार आहेत. आरआरआरच्या निर्मात्यांप्रमाणेच 'मिशन राणीगंज' हा ऑस्कर पुरस्कारांसाठी स्वतंत्रपणे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून ऑस्करसाठी मल्याळम चित्रपट '2018-एवरीवन इज अ हिरो' (2018 Everyone is a hero) पाठवण्यात येणार आहे.
'मिशन रानीगंज' मध्ये अक्षय कुमारने जसवंत सिंह गिलची भूमिका निभावली आहे. १९८९ साली कोळसा खाणीत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेची ही कहाणी आहे. जसवंत सिंह यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावत इतरांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने सम्मानित करण्यात आलं होतं.
दरवर्षी चाहते ऑस्कर पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत असतात. 10 मार्च, 2024 रोजी लॉस एंजेलिसमध्ये ऑस्कर सोहळा आयोजित केले जाणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या यादीत कोणत्या हॉलीवूड आणि भारतीय चित्रपटांनी नामांकनात आपले स्थान निर्माण केले आहे, याची घोषणा 23 जानेवारीला होणार आहे.
गेल्यावर्षी ‘RRR’च्या नाटू नाटू गाण्याने इतिहास रचला होता. कारण, हा पहिला भारतीय चित्रपट आहे. ज्याच्या गाण्याला ऑस्कर मिळाला आणि या गाण्याने रिहाना आणि लेडी गागा यांनाही मागे टाकले होते. आता या वेळी ९६ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये कोणता भारतीय चित्रपट जिंकतो आणि कोणता नामांकनांपुरता मर्यादित राहतो हे पाहण्याची सगळ्यांनाच फार उत्सुकता आहे.