अलबत्या-गलबत्या... विक्रमी प्रयोगाचं पडद्यामागचं जग
By प्रसाद लाड | Published: August 16, 2018 03:53 PM2018-08-16T15:53:01+5:302018-08-16T16:35:10+5:30
एका बालनाट्यासाठी एवढी गर्दी व्हावी, हे यश नेमकं कोणाचं, याचा विचार सुरु झाला. मराठी रंगभूमी आता शनिवार-रविवार पुरती उरली, या गोष्टीला हे बालनाट्य छेद देत होते. कारण हा शंभरावा प्रयोग रंगत होता तो 95 दिवसांमध्ये.
प्रसाद लाड
शिवाजी नाट्यमंदीराबाहेर तुफान गर्दी होती. नाट्यमंदीराच्या गेटवर चेटकिणीचा कट आऊट सर्वांचे स्वागत करत होता. त्या कटआऊटबरोबर सेल्फी घेण्यासाठी चिमुकल्यांनी रांगा लावल्या होत्या. साडे सहा वाजल्यापासून नाट्यमंदीरात जायला सुरुवात झाली होती. हा त्या दिवसातला पाचवा प्रयोग होता. पण लहानग्यांवर अजूनही चेटकिणीचे गारूड कायम होते, ते गर्दीच्या रुपात दिसत होते. नाट्यमंदीर पूर्ण भरलेले होते. पण प्रयोग सुरु होत नव्हता. कारण सेलिब्रेटी मंडळींना पासेस कमी पडत होते. अखेर नाट्यमंदीरात प्लॅस्टीकच्या खुर्च्या लावण्यात आल्या आणि अलबत्या-गलबत्याच्या दिवसातील विक्रमी पाचव्या आणि शतकी प्रयोगाला सुरुवात झाली. एका बालनाट्यासाठी एवढी गर्दी व्हावी, हे यश नेमकं कोणाचं, याचा विचार सुरु झाला. मराठी रंगभूमी आता शनिवार-रविवार पुरती उरली, या गोष्टीला हे बालनाट्य छेद देत होते. कारण हा शंभरावा प्रयोग रंगत होता तो 95 दिवसांमध्ये.
शंभराव्या विक्रमी प्रयोगाचा पडदा उघडला. अलबत्या-गलबत्याचा ' यो ' आणि चेटकिण साकारणाऱ्या वैभव मांगलेच्या ' किती गं बाई मी हुश्शार ' या वाक्यांनी चिमुकल्यांनी नाट्यमंदीर डोक्यावर घेतलं होतं. चेटकिण हवेत उडण्याचे दृश्य पाहून लहान मुल भारावून गेली, पण त्याचवेळी बॅक स्टेजवर त्या चेटकिणीला उचण्यासाठीची धडपड पाहण्यासारखी होती. खरंतर ती एक ट्रिक, पण त्यासाठी बॅक स्टेजवरचे कलाकार जीवाचे रान करत होते. प्रत्येक सीननुसार अंधारात जो बॅक स्टेजवरच्या कलाकारांचा सेट लावण्याचा प्रयत्न नरजेचे पारणे फेडणारा होता.
मध्यंतरात वडा आणि चहाचा बेत होताच. एका वेगळ्याच विश्वात तू आम्हाला नेलंस, असं अतुल परचुरे यांनी दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरला शाबासकी देत होते. वडा खाताना वैभवचा मेकअप कायम होता. त्यावेळी त्याचे चेटकिणीची नाक थोडेसे दबले गेलेले होते. पहिला अंक पाहून बरेच सेलिब्रेटी भारावले होते. कारण हे लहानमुलांसाठी असलं तरी ते बालनाट्य वाटत नव्हतं.
दुसऱ्या अंकात अजूनचं धमाल सुरु झाली. आता आपण सामना जिंकायला आलो, हा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर होता. स्टेजवर सुरु असलेला डान्स, संवाद विंगेतही सुरु होते. सेलिब्रेशनचा मूड तयार होत होता. पण दुसरीकडे आता एखादी जागा कशी घ्यायची, हे कलाकार विंगेत ठरवत होते. नवं काही तरी करू पाहत होते. त्यामुळेच या नाटकातील विनोद मला नव्याने कळले, असं चिन्मयनेही मान्य केलं. दुसऱ्या अंकात वैभवने, 'आजकल पाव जमींपर...', हे गाणं जेव्हा गायलं तेव्हा त्याला वन्स मोअर आला. सकाळी साडे सातपासून प्रयोग सुरु होता. पण या पाचव्या प्रयोगातही वैभवने वन्स मोअर घेतला. एकाचवेळी दोन चेटकिण दिसणं, जादूचे प्रयोग होणं, याने लहान मुलं भारावून गेली होती. दुसऱ्या अंकात वैभव चेटकिणीच्या रुपातून भटजीच्या भूमिकेत स्टेजवर येतो. त्यावेळी ज्या वेगात चेटकिणीचे कपडे काढून धोतर नेसले, ते पाहताना वैभव पाच प्रयोगांनंतरही फिट असल्याचे दिसत होते.
अलबत्या-गलबत्याचे शतक पूर्ण झाले आणि स्टेजवर सलिब्रेशन सुरु झाले. यावेळी वैभवला एक फ्रेम भेटवस्तू देण्यात आली. ही स्वीकारताना वैभवने मायबाप रसिक प्रेक्षकांना नमस्कार केला, हे तुमच्यामुळेच शक्य आहे, असं तो बोलला. त्यानंतर विक्रमी प्रयोगाचा केक कापला गेला आणि सेलिब्रेशनला सुरुवात झाली. पडदा पडला तेव्हा वैभवने जी चिन्मयला मिठी मारली त्यामध्ये या विक्रमाचे सार होते, विश्वास होता, तो सार्थ ठरवल्याचा आनंद, अभिमान होता. आता जर नवीन कपडे घेतले तर आम्ही हे जपून ठेवू, अस म्हणत सहकलाकार भावूक झाले होते.
नाटकानंतर कुशल बद्रीके तर ' खतरनाक... खतरनाक ' असा ओरडत होता. वैभवने मेकअप काढला आणि सेलिब्रेशन पुन्हा सुरु झालं. आता सहावा प्रयोगही आपण करून आपलाच विक्रम आपण मोडीत काढू, असे सहकलाकार बोलत होते. कारण पाच प्रयोग करूनही त्यांच्यामध्ये बरीच उर्जा होती. वैभव जेव्हा निघायला लागला तेव्हा त्याच्याच मुलाने अलबत्या-गलबत्या या गाण्यावर पूर्ण डान्स केला. हे या नाटकाचे यश आहे, असे आपण म्हणू शकतो. निर्माते राहुल भंडारे यांनी खास भेटवस्तू कलाकरांना दिल्या. त्याचा आनंदाने कलाकारांनी स्वीकार केला.
सर्व कलाकार निघाले. नाट्यमंदीराबाहेर आले. तेव्हा वैभवने आपली गाडी काढली आणि तो ड्राइव्ह करत घरी घेऊन गेला. पाच प्रयोग, जवळपास 15 तास तो काम करत होता. तरीही त्याच्या चेहऱ्यावर क्षीण जाणवत नव्हता. वैभव जर पाच प्रयोग करून एवढा फिट असेल तर या नाटकाचा सहावा प्रयोगही होऊ शकतो, हा विचार कुठेतरी मनात येऊन गेला.