उरल्या सगळ्या त्या आठवणी...! आपल्या १०० वर्षांच्या चाहतीच्या निधनामुळे आदेश बांदेकर झाले भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 03:30 PM2023-05-23T15:30:22+5:302023-05-23T15:31:04+5:30
Aadesh Bandekar : सांगलीत राहणाऱ्या या १०० वर्षीय आजींचे नुकतेच निधन झाले. या निधनामुळे आदेश बांदेकर खूपच भावुक झाले आहेत.
दार उघड बये दार उघड म्हणत आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) म्हणजेच समस्त वहिनी वर्गाचे लाडके भाऊजी घराघरात पोहोचले. हा कार्यक्रम गेल्या तब्बल १९ वर्षे अविरत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आदेश बांदेकर या मालिकेच्या निमित्ताने वेगवेगळ्या घरी जाऊन तेथील गृहिणींचा, किंवा नोकरी व्यवसाय सांभाळून आपल्या घराची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिनांचा सन्मान करतात. या कार्यक्रमातून त्यांनी असंख्य चाहते कमावले. काहींची घरे पुन्हा जोडली, हरवलेल्या बहिणीची एका ताईला भेट घालून दिली, घरातून पळून गेलेल्या मुलीवर चिडलेल्या बाबा आपल्या मुलीशी बोलू लागले, असे कित्येक किस्से बांदेकरांबद्दल आहेत. मात्र आदेश बांदेकर आपल्या १०० वर्षांच्या चाहतीच्या निधनामुळे भावुक झाले आहेत.
आदेश बांदेकरची ही चाहती १०० वर्षांची होती. सांगलीत राहणाऱ्या या १०० वर्षीय आजींचे नुकतेच निधन झाले. या निधनामुळे आदेश बांदेकर खूपच भावुक झाले आहेत. त्यांनी एका सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सांगलीला राहणाऱ्या या आजी होम मिनिस्टर या कार्यक्रमासोबतच अभिनेते आदेश बांदेकर यांच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या. टीव्हीवर आदेश बांदेकर दिसले की त्यांना ते हात जोडून नमस्कार करायच्या. त्यांच्याकडे पाहात त्या गाणीही गुणगुणायच्या, इतकेच नाही तर त्यांना बांदेकरांचे भास व्हायचे. ते आपल्या बाजूला बसून आपली गाणी ऐकत आहेत असे त्यांना वाटायचे.
या आजींनी बांदेकरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली. आजींची इच्छा बांदेकरांना समजताच तात्काळ त्यांनी त्यांची भेट घेतली. आपल्या इतक्या गोड चाहतीला भेटायला मिळाले म्हणून बांदेकर खूप खुश होते. मात्र काल त्यांना अचानक धक्का बसला. एका वृत्तपत्रात या आजींच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध झाली होती. ती बांदेकरांनी वाचली आणि ते सून्न झाले.