'पुष्पा' गाजला पण अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो' ला होतोय जोरदार विरोध; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 04:27 PM2022-01-21T16:27:46+5:302022-01-21T16:28:50+5:30
Allu Arjun: कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' या चित्रपटामुळे होतोय अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो'ला विरोध?
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुप्षा' (Pushpa) हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. विशेष म्हणजे या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकने तर अशरक्ष: सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. चित्रपटातील डायलॉग्ससह त्यातील गाणीही चांगलीच लोकप्रिय होत आहे. परंतु, या चित्रपटावर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत असतांनाच अल्लू अर्जुनच्या अला वैकुंठपुरमलो (Ala Vaikunthapurramuloo) या चित्रपटाच्या हिंदी रिमेकला मात्र जोरदार विरोध होत आहे.
अलिकडेच 'अला वैकुंठपुरमलो' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परंतु, यामध्येच आता कार्तिक आर्यनच्या (kartik aryan) 'शहजादा' (Shehzada) या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अला वैकुंठपुरमलोच्या हिंदी डब करण्याला विरोध केला आहे.
26 जानेवारीला होणार ‘अला वैकुंठपुरमलो’ रिलीज
अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला ‘अला वैकुंठपुरमलो’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, शहजादाचे निर्माते अल्लू अरविंद (Allu Arvind) यांनी या हिंदी रिमेकला विरोध केला असून या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यासाठी ते मुंबईसाठी रवाना झाले आहेत.
अल्लू अरविंद यांची नेमकी मागणी काय?
कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला 'शहजादा' हा चित्रपट अला वैकुंठपुरमलो या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा रिमेक अल्लू अरविंद, भूषण कुमार आणि अमन गिल यांनी मिळून प्रोड्यूस केला आहे. यामध्येच जर, अला वैकुंठपुरमलो हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. तर त्याचा परिणाम शहजादावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे.
मनिष गिरीश शाहकडे चित्रपटाचे राइट्स
अला वैकुंठपुरमलो या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनचे राइट्स मनिष शाह यांच्याकडे आहेत. तसंच शहजादाचे राइट्सदेखील त्यांच्याकडेच आहेत. या दोन्ही चित्रपटाचे हक्क अल्लू अरविंद यांनीच विकले आहेत.
दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाने साऊथमध्ये केली १५० कोटींची कमाई
२०२० मध्ये अल्लू अर्जुनचा अला वैकुंठपुरमलो हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट त्याकाळी चांगलाच गाजला. विशेष म्हणजे या चित्रपटाने तब्बल १५० कोटींची कमाई केली.