#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 05:36 AM2018-10-24T05:36:50+5:302018-10-24T05:41:30+5:30
‘मी टू’ प्रकरणात लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेले अभिनेते आलोकनाथ आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे.
मुंबई : ‘मी टू’ प्रकरणात लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेले अभिनेते आलोकनाथ आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने या प्रकरणात आलोकनाथ आणि साजिद खान यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीला तातडीने उत्तर देण्याची सक्त ताकीदही वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने या दोघांना केली आहे.
‘मी टू’ प्रकरणात यापूर्वी इंडियन फिल्म आणि टेलिव्हिजन डायरेक्टर्स या संघटनेने या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिसीला आलोकनाथ यांनी उत्तर दिले होते. मात्र, हे उत्तर समाधानकारक नसल्यामुळे वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज या संघटनेने आलोकनाथ यांना ही कारणे दाखवा नोटीस आपल्या संघटनेकडून पाठविण्याचा निर्णय घेतला. साजिद खानने तर कोणत्याच संघटनेकडून आलेल्या कारणे दाखवा नोटिसीला अद्यापपर्यंत उत्तर दिलेले नाही. त्यामुळे या वेळीही साजिदने तेच केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश संघटनेने दिले आहेत. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात, सिन्टाचे सरचिटणीस सुशांत सिंग यानेही ही लढाई यापुढे आणखी कठीण होणार आहे, असे सांगत आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. मी टू मोहिमेला अधिक बळ देण्याची गरजही त्याने बोलून दाखविली आहे. दरम्यान, अजय देवगण आणि तब्बूचा आगामी चित्रपट ‘दे दे प्यार दे’ची सहायक दिग्दर्शिका तान्या पॉल सिंह हिने अजयचा मेकअप आर्टिस्ट हरिश वाधोने याच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. तान्याच्या या आरोपानंतर अजय देवगणने तत्काळ हरिशची हकालपट्टी केली आहे.
>राखीने माफी मागण्याची तनुश्रीची मागणी
तनुश्री दत्ताला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी राखी सावंत हिला नोटीस पाठवण्यात आल्याचे अॅड. नितीन सातपुते यांनी सांगितले. राखीने तनुश्रीची प्रसारमाध्यमांसमोर माफी मागावी अशी मागणी यात केली आहे. नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांत राखीने माफी मागितली नाही तर तिच्याविरुद्ध १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहोत. तसेच तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र ओशिवरा पोलिसांना लवकरच देण्यात येणार असल्याचे अॅड. सातपुते यांनी नमुद केले.