'तिने सोडला? छे! तिला हाकललं...' अमिषा पटेलने सांगितला 'कहो ना प्यार है' चा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 01:24 PM2023-09-03T13:24:58+5:302023-09-03T13:41:31+5:30
खरंतर करिनाने सिनेमा सोडला नव्हता. तर राकेशजींनीच तिला सिनेमातून काढलं होतं.
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी २००० साली आपला मुलगा हृतिक रोशनला (Hritik Roshan) 'कहो ना प्यार है' या सिनेमातून लाँच केलं. हा सिनेमा तेव्हा ब्लॉकबस्टर ठरला होता. स्टोरी, गाणी, अभिनय अशा सर्वच तऱ्हेने सिनेमा उत्कृष्ट होता. अमिषा पटेलनेही (Amisha Patel) याच सिनेमातून पदार्पण केलं होतं. पण अमिषाच्या आधी बॉलिवूडची बेबो करिना कपूर (Kareena Kapoor) या सिनेमात काम करणार होती. तिने सिनेमाचा काही भाग शूटही केला होता. मात्र मध्येच तिच्या जागी अमिषा पटेलची एंट्री झाली. अनेक वर्षांनी तेव्हा नक्की काय घडलं होतं याचा खुलासा अमिषा पटेलने केला आहे.
'बॉलिवूड बबल'शी संवाद साधताना अमिषा म्हणाली,'खरंतर करिनाने सिनेमा सोडला नव्हता. तर राकेशजींनीच तिला सिनेमातून काढलं होतं. कारण त्यांच्यात मतभेद होते. पिंकी आँटी म्हणजेच हृतिकच्या आईने सांगितले की सेट तयार होता. त्यावर करोडो रुपये खर्च झाले होते. तीन दिवसात नवी सोनिया शोधणं कठीण होतं.'
अमिषा पुढे म्हणाली,'हा सिनेमा म्हणजे हृतिकचा डेब्यू सिनेमा होता. त्यामुळे सगळेच काळजीत होते. राकेशजींनी मला एका लग्नात पाहिलं होतं. तेव्हा त्यांच्या डोक्यात मीच सोनिया आहे हे फिरत होतं. मी हो म्हणेल अशी आशा त्यांना होती. अशा प्रकारे माझी निवड झाली.'
सिनेमा रिलीज झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी करिना कपूरनेही यावर मौन सोडलं होतं. ती म्हणाली होती की,'हा सिनेमा केवळ हृतिकसाठी बनवण्यात आला होता. त्याच्या प्रत्येक फ्रेम आणि क्लोजअपसाठी त्याच्या वडिलांनी पाच तास खर्च केले. जेव्हा की अमिषासाठी पाच सेकंदही दिले नाहीत. अनेक सीन्समध्ये अमिषाच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, डोळ्यांखाली डाग आहे. ती सुंदर दिसली नाही. मी ही सिनेमा केला नाही याचा मला आनंद आहे.'
त्यानंतर करिना, हृतिक आणि अमिषा तिघांचंही करिअर जोरदार होतं. करिना आणि हृतिकने मोठा पल्ला गाठला. अमिषा मात्र काही काही हिट सिनेमे दिल्यानंतर गायब झाली. नुकताच तिचा 'गदर 2' सिनेमा रिलीज झाला असून बऱ्याच वर्षांनी तिला ब्लॉकबस्टर सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे.