अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 04:39 PM2024-11-21T16:39:33+5:302024-11-21T16:40:15+5:30
खात्री नसताना माहिती पसरवणाऱ्यांना चपराक
सध्या बच्चन कुटुंब चर्चांच्या केंद्रस्थानी आहे. बच्चन कुटुंबातील सदस्यांपासून ऐश्वर्या आणि आराध्या दुरावल्याचं अनेक प्रसंगी दिसून आलं आहे. अंबानींचा लग्नसोहळा असो, किंवा नुकताच आराध्याचा वाढदिवस असो ऐश्वर्या आणि आराध्या कुटुंबासोबत दिसल्या नाहीत. अभिषेक-ऐश्वर्या घटस्फोट घेत आहेत अशीही चर्चा झाली. यावर अमिताभ बच्चन कधीच काही बोलले नाहीत. पण आता त्यांनी कालच्या ब्लॉगमध्ये लिहिलेल्या काही गोष्टींनी लक्ष वेधून घेतलं आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अनेक वर्षांपासून ब्लॉगमध्ये आपलं म्हणणं मांडत असतात. लेटेस्ट ब्लॉगमध्ये त्यांनी लिहिले, "सर्वांपेक्षा वेगळं असणं आणि अशा आयुष्यावर विश्वास ठेवणं यासाठी खूप धैर्य लागतं. मी माझ्या कुटुंबाबद्दल क्वचितच बोलतो कारण तो माझा निर्णय आहे जो मी कायम पाळला. तर्क हे तर्कच असतात, ते खात्री केलेले नसतात. पडताळणी करणं हे तुमचं काम आहे. म्हणून मी तुमच्या कामाला आव्हान देणार नाही आणि तुम्ही करत असलेल्या समाजकार्याचीही प्रशंसाच करतो."
"प्रश्नचिन्ह टाकून माहिती पसरवणाऱ्यांवर ते लिहितात,"प्रश्नचिन्ह टाकलं म्हणजे तुम्ही लावलेला तर्क वैध आहे असं मानलं जातं. मात्र या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या प्रश्नचिन्हामुळे संशयाचं बीज रोवलं जातंच. एखाद्याला काय वाटतं ते तो बोलूच शकतो पण जेव्हा त्यापुढे प्रश्नचिन्ह लागतं तेव्हा तो स्वत:च त्याचं म्हणणं प्रश्नार्थक असल्याचं ठरवतो."
ते पुढे लिहितात, "वाचकांनी यावर आंधळेपणाने विश्वास ठेवावा आणि तुम्ही दिलेली माहिती पसरली म्हणजे तुमचं काम झालं. मग ते व्हायरल होतं. त्यावर प्रतिक्रिया येतात तेव्हा आणखी व्हायरल होतं. ती प्रतिक्रिया विश्वासू असो किंवा नकारात्मक, त्यामुळे लेखाचा विस्तारच होतो. हा लेखनाचा धंदा सुरु आहे. जगाला असत्य दाखवा किंवा प्रश्नार्थक असत्य दाखवा आणि तुमचं काम झालं. तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीला तरी हे पटतं का? प्रत्येक क्षेत्रात हे दिसून येतंच असं म्हणत मी माझ्या या लेखातून सुरक्षित होतो."