'बिग बीं'च्या खास गोष्टींचा लवकरच होतोय लिलाव; तुम्हीही खरेदी करू शकता या वस्तू!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 07:30 PM2023-10-01T19:30:44+5:302023-10-01T19:33:12+5:30
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा येत्या ११ ऑक्टोबर रोजी ८१ वा वाढदिवस आहे.
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे मेगास्टार म्हटलं जातं. त्याची फॅन फॉलोइंग देशातच नाही तर परदेशातही आहे. आज बिग बींकडे पैसा किंवा प्रसिद्धीची कमतरता नाही. आपल्या दमदार अभिनयातून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा येत्या ११ ऑक्टोबर रोजी ८१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात चाहत्यांमध्ये उत्साह आहे. विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे देशभरात जंगी सेलिब्रेशन केले जाईल.
येत्या 5 ते 7 ऑक्टोबर 2023 दरम्यान ‘बच्चनलिया’ नावाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात बीग बींशी संबंधित अनेक खास गोष्टींचा लिलाव होणार आहे. जर तुम्ही अमिताभ बच्चनचे चाहते असाल तर, तुम्हीही या गोष्टी खरेदी करु शकता. चला जाणून घेऊया काय आहेत त्या खास गोष्टी.
या लिलावात समाविष्ट केल्या जाणार्या वस्तूंमध्ये त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचे पोस्टर, फोटो, लॉबी कार्ड, शोकार्ड फोटो, चित्रपट पुस्तके आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रतिष्ठित चित्रपटांच्या मूळ कलाकृतींचा समावेश आहे. त्यामुळे चाहत्यांना त्याची फिल्मी करिअर पाहण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
लिलावात मुख्य गोष्टीमंध्ये जंजीर चित्रपटातील शोकार्ड्स, सिल्व्हर जिलेटिन फोटोग्राफिक प्रिंट. तर मजबूर (1974), मिस्टर नटवरलाल (1979), द ग्रेट गॅम्बलर (1979), सिलसिला (1981), कालिया (1981), नसीब (1986) चे काही अप्रतिम पोस्टर्स असणार आहेत.
याशिवाय प्रसिद्ध ग्लॅमर फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेला अमिताभ बच्चन यांचा एक दुर्मिळ स्टुडिओ पोर्ट्रेट असेल. चित्रपट मासिकाच्या प्रसिद्ध कव्हर स्टोरीसाठी एक खास फोटो-शूट देखील केले आहे. ज्यामध्ये दोन सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन आहेत.
सध्या बिग बींच्या वाढदिवसासाठी केवळ बच्चन कुटुंबच नाही. तर त्यांचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतही खूप उत्सुकता आहे. दरवर्षी बिग बींचे चाहते जलसा बंगल्याबाहेर शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी करतात. फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातून चाहते बिग बींना शुभेच्छा देण्यासाठी येतात. ही गर्दी पाहून बिग बींवर त्यांच्या चाहत्यांचे किती प्रेम आहे याची प्रचिती येते.