ज्येष्ठ गीतकार आनंद बक्षी यांचा नातू बॉलिवूडमध्ये आहे या क्षेत्रात कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 06:00 AM2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:02+5:30
ज्येष्ठ गीतकार आनंद बक्षी यांचा नातू गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्येच कार्यरत असला तरी तो आपल्या आजोबांप्रमाणे गीतकार नाहीये.
आदित्य दत्तने आशिक बनाये आपने, टेबल नं 21 यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता तो कमांडो 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
कमांडो 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याबाबत तुला विचारले असता तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
कमांडो या चित्रपटाचे दोन्ही भाग मी पाहिले आहेत. विद्यूत जामवालच्या ॲक्शनचा तर मी फॅन आहे. विद्युतसोबत काम करण्याचा माझा कित्येक महिन्यांपासून विचार सुरू होता. मला या चित्रपटाबाबत विचारले असता मी लगेचच होकार दिला. मी या चित्रपटाकडे एक आव्हान आणि संधी म्हणून पाहिले. कारण मी आतापर्यंत कधीच ॲक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले नाही.
कमांडो 3 आतापर्यंतच्या कमांडोच्या भागांपेक्षा कशाप्रकारे वेगळा असणार आहे?
कमांडो 3 हा आतापर्यंतच्या कमांडोच्या सगळ्या भागांपेक्षा वेगळा असावा यासाठी मी प्रयत्न केले आहेत. या चित्रपटात ॲक्शन इतकेच पटकथेला देखील महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट कमांडोच्या इतर भागांपेक्षा अधिक चांगला आणि मनोरंजक असणार आहे. तसेच प्रत्येक दिग्दर्शकाची काम करण्याची पद्धत ही वेगळी असते. त्यामुळे कमांडो 3 ची पटकथा मी माझ्या स्टाईलने प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
तू आनंद बक्षी यांचा नातू आहेस, आजोबांप्रमाणे तू देखील कविता, गाणी लिहितोस का?
माझ्या आजोबांनी लिहिलेली सगळीच गाणी गाजली आहेत. प्रसिद्ध गीतकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. मी त्यांचा नातू असलो तरी मला गाणी लिहिता येत नाहीत. केवळ त्यांच्यामुळे मला संगीताची चांगली जाण आहे. त्यामुळेच बहुधा माझ्या सगळ्याच चित्रपटातील गाणी ही खूपच चांगली असतात. मला त्यांच्यामुळेच चित्रपटसृष्टीत येण्याची संधी मिळाली.