कान्समध्ये होणार अनंत महादेवन यांच्या ‘माई घाट’चा प्रीमिअर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 02:50 PM2020-06-22T14:50:25+5:302020-06-22T14:53:39+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कान्स सोहळा नव्या रूपात साजरा होत आहे.
दरवर्षी मे महिन्यात होणारा कान्स फिल्म फेस्टिवल यावर्षी कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडला होता. 12 मे रोजी हा सोहळा होणार होता. आता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 73 वा कान्स सोहळा नव्या रूपात साजरा होत आहे. याची सुरुवात मार्चे डू फिल्म फेस्टिवलपासून झाली आहे. मार्चे डू फिल्म फेस्टिवल हा ग्लोबल फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठा सोहळा 22 जूनपासून सुुरू झालाय. यंदा हा सोहळा ऑनलाइन होत आहे. या सोहळ्यात अभिनेते, दिग्दर्शक व पटकथा लेखक अनंत महादेवन यांचा ‘माई घाट- क्राइम 103/ 2005’ हा मराठी सिनेमा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
MAI GHAT: CRIME NO 103/2005 is
— ANANTH N MAHADEVAN (@ananthmahadevan) June 22, 2020
Honoured to be selected by the Ministry of Information & Broadcasting as India’s Official entry for the prestigious CANNES festival’s Marche’ du Film section. pic.twitter.com/czewryfcBy
25 जूनला या सिनेमाचे प्रीमिअर होईल. अनंत महादेवन यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, यंदा कोणताही सिनेमा स्पर्धेत नाही़ कोणताही अवार्ड नाही. परंतु कान्स प्रीमिअर असणे हा माझा व माझ्या चित्रपटाचा बहुमान आहे. आपल्या चित्रपटाच्या मार्केटींगसाठी हे लेबल महत्त्वाचे आहे.
‘माई घाट- क्राइम 103/ 2005’ हा एक बायोपिक आहे. एका आईची सत्यकथा आहे. या आईच्या एकुलत्या एका मुलाचा पोलिसांनी अतोनात छळ केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी ही माऊली दहा वर्षे लढली. तिचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे.
या चित्रपटाने आधीच अनेक राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. एनवायसी साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल न्यूयॉर्कमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. शिवाय येथे या चित्रपटासाठी अभिनेत्री उषा जाधव हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व अनंत महादेवन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्य पुरस्कारने गौरविण्यातही आले होते.
उषा जाधवने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.