...आणि मी या क्षेत्राकडे वळलो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:13 AM2017-07-21T03:13:47+5:302017-07-21T03:13:47+5:30
जतिन वागळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मांजा’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जतिन यांनी याआधी ‘चकवा’, ‘बंध नायलॉन’चे यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले
- Prajakta Chitnis
जतिन वागळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मांजा’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जतिन यांनी याआधी ‘चकवा’, ‘बंध नायलॉन’चे यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या ‘मांजा’ या चित्रपटाबद्दल आणि त्यांच्या एकंदर कारकिर्दीविषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...
तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात आहात, तुमच्या कारकिर्दीची सुरुवात कशाप्रकारे झाली?
- माझे वडील सतीश वागळे हे प्रसिद्ध निर्माते होते. त्यांनी ‘प्यार ही प्यार’, ‘यार मेरा’ यांसारख्या हिंदी चित्रपटांची निर्मिती केली होती. मुंबईत आमचे सगळे काही सुरळीत सुरू होते; पण माझ्या भावाला अस्थमाचा त्रास सुरू झाल्याने आम्ही पुण्याला शिफ्ट व्हायचे ठरवले. पुण्यात गेल्यावर त्यांनी ‘याला जीवन ऐसे नाव’ या मालिकेची आणि ‘सुखी संसाराची बारा सूत्रे’ या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट आणि मालिका या दोघांनाही पंचम दा यांनी संगीत दिले होते. सुखी संसाराची बारा सूत्रे या चित्रपटाच्या वेळी मी माझ्या वडिलांसोबत काम केले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहीच वर्षांत माझ्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर मी सिनेमोटोग्राफीकडे वळलो. त्यानंतर ‘पिंपळपान’ या मालिकेसाठी मी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते आणि २००५ मध्ये ‘चकवा’ या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटानंतर माझा दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला. मी आजवर बंध नायलॉनचे, एक मराठी माणूस यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे; तसेच दरम्यानच्या काळात मी काही चित्रपटांचे लेखनदेखील केले.
‘मांजा’ या चित्रपटाचा प्रवास कसा सुरू झाला?
- ‘मांजा’ या चित्रपटाची कथा मी दहा वर्षांपूर्वीच लिहिली होती. त्यावेळी त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश यांना मी या चित्रपटाची कथा ऐकवली होती. ते दोघे त्यावेळी एका कंपनीत काम करत होते. पण, काही कारणास्तव हा चित्रपट त्यावेळी बनू शकला नाही; पण काही वर्षांनी त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश यांनी त्यांचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आणि हा चित्रपट आपण मराठीत बनवूया का, असे मला विचारले आणि तिथून या चित्रपटावर आम्ही पुन्हा काम करायला सुरुवात केली.
या चित्रपटातील कलाकारांची निवड कशी केली गेली?
- अश्विनी भावे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असाव्यात असे मला वाटत होते. बंध नायलॉनचे या चित्रपटाच्या वेळीच मी त्यांना कथा ऐकवली होती. त्यांनी कथा ऐकताच चित्रपटासाठी होकार दिला; पण या चित्रपटासाठी त्यांना खूप सारा वेळ द्यावा लागणार होता. पण, या गोष्टीसाठी त्या लगेचच तयार झाल्या. अश्विनी भावेंनी होकार दिल्यावर, आम्ही मुलांच्या भूमिकेसाठी कलाकारांची शोधाशोध करायला सुरुवात केली. अनेक कलाकारांच्या आॅडिशन घेतल्यानंतर त्यातून आम्ही रोहित फाळके आणि सुमेध मुदगलकर यांची निवड केली. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी आम्ही संपूर्ण टीमसोबत वर्कशॉपदेखील केले होते. पुण्यातील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ला यांच्याकडून मी एखादा रुग्ण कशाप्रकारे चालेल, त्याची देहबोली कशी असेल हे सगळे जाणून घेतले होते. या सगळ्या गोष्टी वर्कशॉपमध्ये समजावून सांगण्यात आल्या. संपूर्ण टीमची वर्कशॉपच्या दरम्यान संपूर्ण तयारी करून घेण्यात आली होती. त्यामुळे चित्रीकरण करणे खूपच सोपे गेले.
या चित्रपटाची तांत्रिक टीम देखील खूप चांगली आहे, त्याविषयी काय सांगाल?
- या चित्रपटाचे चित्रीकरण हे ठराविक वातावरणातच करायचे असे आमचे आधीच ठरले होते. त्याप्रमाणे आम्ही चित्रीकरण केले. तसेच, चित्रीकरणादरम्यान कोणतेही अधिकचे लाइट्स वापरले नाहीत. घरातील लाइटवर आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. फसाहत खान यांनी त्यांच्या कॅमेऱ्याने या चित्रपटातील क्षण खूपच चांगल्या प्रकारे टिपले आहेत, तर अनुराग यांनी या चित्रपटाला बँकराऊंड म्युझिक दिले आहे. त्यांना अजिबातच मराठी येत नाही. पण चित्रपटातील प्रत्येक दृश्यातील भावना समजून घेऊन त्यांनी खूपच चांगले संगीत दिले आहे. बॅलॉन फॉन्सेका हे या चित्रपटाचे साऊंड डिझायनर आहेत तर उपेंद्र सिधये यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. खूपच चांगली टीम या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे.