Thar Movie Review: 'थार'च्या ओसाड भूमीतील सूडकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 04:46 PM2022-05-08T16:46:01+5:302022-05-08T16:51:47+5:30

Thar Movie Review: सूड घेणारा नेहमी दोन चिता रचतो. एक शत्रूची आणि एक आपली... हेच या चित्रपटाचं सार आहे. जाणून घ्या कसा आहे अनिल कपूर व हर्षवर्धन कपूर या बापलेकाचा हा सिनेमा...

Anil Kapoor his son Harsh Varrdhan Kapoor film Thar Movie Review in marathi | Thar Movie Review: 'थार'च्या ओसाड भूमीतील सूडकथा

Thar Movie Review: 'थार'च्या ओसाड भूमीतील सूडकथा

googlenewsNext

संजय घावरे
..........................
कलाकार : अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर, फातिमा सना शेख, जितेंद्र जोशी, मुक्ती मोहन, अक्षय ओबेरॅाय, राहुल सिंग, मंदाना करीमी
दिग्दर्शक : राज सिंह चौधरी
निर्माता : अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर
शैली : अॅक्शन-थ्रीलर
कालावधी : 1 तास 48 मिनिटे

दर्जा : **1/5  
...........................

 Thar Movie Review : 'बदले की पीडा बडी जोखम की पीडा है. न जीने देती है न मरने देती है...' हे चित्रपटाच्या क्लायमॅक्सनंतर अनिल कपूरच्या मुखातील वाक्य 'थार'चा सारांश सांगणारं आहे. सूड भावनेची तलवार दुधारी असते. शत्रूला मारल्यानंतरही एक गोळी आपल्या छातीत रुतून बरगड्या पोखरत रहाते. सूडभावना ना न्याय करू शकत आणि ना निर्णय देऊ शकत. सूड घेणारा नेहमी दोन चिता रचतो. एक शत्रूची आणि एक आपली, जी तो आपल्यासोबत घेऊन चालत राहतो कायमचा... हेच या चित्रपटाचं सार आहे. दिग्दर्शक राज सिंह चौधरी यांनी या चित्रपटासाठी अनिल कपूर (Anil Kapoor)आणि हर्षवर्धन कपूर ( Harsh Varrdhan Kapoor) या पिता-पुत्रांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे.

कथानक : भारत आणि पाकिस्तानच्या बॅार्डरवरील राजस्थानमधील एका गावातील हि कथा आहे. बकऱ्यांना झाडांचा पाला देण्यासाठी झाडावर चढून पानं तोडणाऱ्या तरुणावर कोणीतरी गोळी झाडतं. दागिने चोरून त्याला झाडाला लटकवतं. त्याची चौकशी करण्याची जबाबदारी पोलिस इन्स्पेक्टर सुरेखा सिंगकडे येते. त्याच वेळी गावात सिद्धार्थ नावाचा तरुण अँटीक्स खरेदी करण्यासाठी येतो. आपल्या कामासाठी त्याला काही लोकांची गरज असते. यासाठी तो पन्नाचं घर शोधतो, पण तो मित्रासोबत कामासाठी बाहेर गेलेला असतो. तो परतल्यावर पन्ना आणि त्याच्या मित्राला सिद्धार्थ कामासाठी घेऊन जातो. त्यानंतर कथानक कशाप्रकारे कलाटणी घेतं ते चित्रपटात पहायला मिळतं.

कोणत्याही रहस्यकथेमध्ये रहस्य अखेरपर्यंत न उलगडू देण्याचं महत्त्वाचं काम दिग्दर्शकाला करावं लागतं. 'थार'च्या माध्यमातून सूडकथा सादर करताना दिग्दर्शक राज सिंह चौधरी यांनी हे काम चोख बजावलं आहे. यासोबतच गती वेगवान राखणं हेही तितकंच आवश्यक असतं, मात्र ते साध्य झालेलं नाही. त्यामुळं मंद गतीचा थ्रिलर पहावा लागतो. पटकथेची मांडणी चांगली करण्यात आली असली, तरी कथेचा जीवच कमी असल्यानं फार काही करायला वाव नव्हता. यातील बोलीभाषेला राजस्थानी स्पर्श आहे. अतिशय दुर्गम भागात जाऊन संपूर्ण टिमनं शूट केल्यानं त्याचं कौतुक करावं लागेल. मनोरंजक मसाल्यांचा वापर टाळत सिनेमाला वास्तववादी लुक देण्यात आला आहे. गीत-संगीताला लोकसंगीताची जोड आहे. कॅमेरावर्क खूप सुरेख आहे. ओटीटीवरील आवड ओळखून काही बोल्ड दृश्यांच्या जोडीला शिव्यांचा समावेशही आहेच. यातील काही दृश्ये विचलीत करू शकतात.

कलाकारांचा अभिनय : अनिल कपूरने नेहमीच्याच शैलीत गावातील पोलीस इन्स्पेक्टर साकारत लक्ष वेधूत घेतलं आहे. हर्षवर्धनच्या भूमिकेचा ग्राफ खूप वेगळा आहे. ब्लॅक अँड व्हाईट यांच्यामध्ये असणाऱ्या अस्पष्ट रेषेवरील ही भूमिका हर्षवर्धननं त्याच शैलीत साकारल्याचं जाणवतं. कित्येकदा निर्विकार दिसणारा चेहऱा मनात कोणतं वादळ घोंघावतंय याची हलकीशी कल्पनाही देत नाही. फातिमा सना शेखनं साकारलेली नॅान-ग्लॅमरस अशी गावातील टिपिकल विवाहीत स्त्री तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. बऱ्याच वर्षांनी पुन्हा अनिलच्या जोडीला सतिश कौशिक आहेत. जितेंद्र जोशीनं साकारलेला पन्नाही चांगला झाला आहे. मुक्ती मोहन, अक्षय ओबेरॅाय, राहुल सिंग, मंदाना करीमी यांनीही छोट्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत.

सकारात्मक बाजू : चित्रपटाचा नायक एखाद्या खलनायकासारखा का वागतो यामागील रहस्य शेवटपर्यंत समजत नाही.

नकारात्मक बाजू : गती मंद आहे. मनोरंजनाचे क्षण फार कमी असल्यानं वाळवंटासारखाच चित्रपटही रुक्ष वाटतो.

थोडक्यात : सूडभावना माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकते आणि सूड घेतल्यावरही ती व्यक्ती सुखी होते का या प्रश्नांची उत्तरं या चित्रपटात असल्यानं पहायला हरकत नाही.

Web Title: Anil Kapoor his son Harsh Varrdhan Kapoor film Thar Movie Review in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.