"लोक धर्मांतर करून मुस्लीम होतात, पण..." 'ॲनिमल'मधील बॉबी देओलच्या भूमिकेबद्दल संदीप रेड्डी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 03:07 PM2023-12-20T15:07:49+5:302023-12-20T15:12:46+5:30
"...म्हणून बॉबी देओलचं पात्र मुस्लीम", 'ॲनिमल'चे दिग्दर्शक संदीप रेड्डी यांचं वक्तव्य चर्चेत
रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'ॲनिमल' सिनेमा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या सिनेमातीलबॉबी देओलच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. बॉबी देओलने या सिनेमात मुस्लीम असलेल्या अबरारची भूमिका साकारली आहे. 'ॲनिमल'मधील बॉबी देओलच्या पात्राबाबत पहिल्यांदाच दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी भाष्य केलं आहे. बॉबी देओलने साकारलेलं पात्र मुस्लीम दाखवण्याचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे.
"जेव्हा लोक आपला आत्मविश्वास गमावून बसतात. तेव्हा लोक त्यांच्याकडे येऊन 'चर्चमध्ये जा किंवा बाबाकडे जा...ते तुला ताविज देतील, तुझं नाव बदल...' असं सांगताना मी पाहिलं आहे. आयुष्यात अनेक गोष्टी घडल्यामुळे लोक त्यांचा धर्म बदलतात. आपला पूर्नजन्म झाला आहे आणि ही आपली नवी ओळख आहे, असं त्यांना वाटतं. अनेक जण मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करतात. पण, कोणीही हिंदू धर्मात धर्मांतर करत नाही. म्हणून मी अबरारला मुस्लीम दाखवण्याचा विचार केला. मुस्लीम धर्मीयांना चुकीचं दाखवण्याचा काहीही उद्देश नव्हता," असं संदीप वांगा म्हणाले.
दरम्यान, १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या 'ॲनिमल' सिनेमाची क्रेझ १९ दिवसांनंतरही कायम आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत जगभरात ८५० कोटींची कमाई केली आहे. रणबीर कपूरसोबत या सिनेमात रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.