'रामायण' मध्ये सीता मातेच्या भूमिकेत दिसणार अंजली अरोरा, खूश होत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 01:30 PM2024-05-05T13:30:44+5:302024-05-05T13:31:23+5:30
'कच्चा बदाम' गर्ल म्हणून अंजली अरोराला प्रसिद्धी मिळाली होती.
नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री साई पल्लवी सीतामातेच्या भूमिकेत आहे. सध्या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. दरम्यान अभिषेक सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'श्री रामायण कथा' मध्ये माता सीतेच्या भूमिकेत अंजली अरोरा (Anjali Arora) झळकणार आहे. अंजली अरोरा 'कच्चा बदाम' या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. ती सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे.
'श्री रामायण कथा' मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी निवड झाल्यामुळे अंजली अरोरा फारच उत्साहित आहे. आनंद व्यक्त करताना ती म्हणाली, "ही भूमिका मिळाल्याने मी धन्य झाले आहे. माता सीतेचं पवित्र चरित्र कोणीच नाकारु शकत नाही. दिग्दर्शकाने मला यासाठी कसं काय घेतलं हा प्रश्न मलाही पडलाच होता. मी विचारलं असता ते म्हणाले की त्यांनी काही अभिनेत्रींना शॉर्टलिस्ट केलं होतं ज्यात माझाही समावेश होता. मी या भूमिकेला न्याय देईल असा त्यांना माझ्यावर विश्वास असणार म्हणूनच त्यांनी मला फायनल केलं. मागच्याच महिन्यात मला फायनल केलं होतं तेव्हापासून मी व्हिडिओ बघत आहे, वाचत आहे आणि शिकत आहे. या भूमिकेला मी न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन."
नितेश तिवारीसुद्धा 'रामायण' बनवत असून त्यातील अभिनेत्रीसोबत होणाऱ्या तुलनेवर अंजली म्हणाली, "तुलना होतच राहते मला माहित आहे आणि याला कोण नाही घाबरणार? माझी तुलना कोणा बॉलिवूड अभिनेत्रीसोबत केली जात असेल तर मला आनंदच होईल."