'झुंड'मधील 'या' अभिनेत्याला मिळाला फिल्मफेअर अवॉर्ड, नागराज मंजुळेंनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 10:26 AM2023-04-28T10:26:02+5:302023-04-28T10:27:25+5:30
नागराज मंजुळे यांनी फेसबुक पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले आहे. सिनेमात त्याची निवड कशी झाली याचा किस्सा इंटरेस्टिंग आहे
चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार समजला जाणारा फिल्मफेअर अवॉर्ड (Filmfare Awards 2023) सोहळा काल मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये थाटात पार पडला. राजकुमार राव आणि आलिया भट यांनी यंदाच्या फिल्मफेअर अवॉर्डवर नाव कोरले. तर दुसरीकडे सर्वोत्कृष्ट अभिनेता डेब्यूसाठी नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधील अभिनेता अंकुश गेडामला (Ankush Gedam) फिल्मफेअर मिळाला आहे. मराठी सिनेसृष्टीसाठीही ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.
मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा पहिलाच हिंदी सिनेमा 'झुंड' मधील मुख्य अभिनेता अंकुश गेडामला बेस्ट डेब्यू कॅटेगरीत फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अंकुशने सिनेमात 'डॉन' ची भूमिका साकारली. नागराज मंजुळे यांनी फेसबुक पोस्ट करत अंकुशचे अभिनंदन केले आहे. त्याचा 'झुंड'मधील फोटो त्यांनी शेअर केला आहे.
Filmfare Awards 2023 : आलिया भट, राजकुमार राव सर्वोत्कृष्ट कलाकार; वाचा फिल्मफेअर अवॉर्डची संपूर्ण लिस्ट
झुंडमध्ये अंकुशची निवड कशी झाली?
'झुंड' सिनेमात अंकुश गेडामने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याला सिनेमात 'डॉन' दाखवण्यात आले आहे. अंकुश मुळचा नागपूरचा. त्याची सिनेमात निवड कशी झाली याची गोष्ट इंटरेस्टिंग आहे. अंकुशला अक्षरश: रस्त्यावर बघून निवडलं होतं. अंकुश शहरात गणपती विसर्जन मिरवणूकीत नाचत होता. तेव्हा नागराज यांचे भाऊ भूषण मंजुळे यांनी त्याला पाहिलं त्याचे फोटो, व्हिडिओ काढले. सिनेमातील सर्व कास्ट मिळाली होती पण डॉन भूमिकेसाठी कोणी मिळत नव्हतं. नागराज मंजुळे नागपूरमधून निघणारच होते. त्या दिवशी गणपती विसर्जन होतं. मिरवणूकीत नाचणाऱ्या अंकुशला पाहून त्याची थेट निवडच झाली.