बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टारकिडची एन्ट्री, लवकरच करणार चित्रपटाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 04:53 PM2023-11-22T16:53:25+5:302023-11-22T16:53:51+5:30
ही स्टारकिड सध्या बोस्टनमधील बर्कली स्कूल ऑफ म्युझिकमध्ये संगीताचं प्रशिक्षण घेत आहे.
बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक शेखर कपूर सध्या इफ्फीमुळे लाइमलाईटमध्ये आहेत. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे ज्युरी प्रमुख शेखर कपूर यांनी महोत्सवाच्या सुरुवातीला रेड कार्पेटवर स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. या वेळी शेखर कपूर यांच्यासोबत त्यांची मुलगी कावेरीदेखील पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार का? या चर्चेला उधाण आले.
शेखर आणि गायिका-अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांची कन्या कावेरी लवकरच सिनेइंडस्ट्रीत वळणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत, पण त्या केवळ अफवा ठरल्या आहेत. अभिनयासोबतच गायनाचंही प्रशिक्षण घेत असलेली कावेरी सध्या इंडस्ट्रीतील लोकांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय बनली आहे. कावेरी सध्या बोस्टनमधील बर्कली स्कूल ऑफ म्युझिकमध्ये संगीताचं प्रशिक्षण घेत आहे.
कावेरी कपूरच्या टॅलेंटनं एका प्रॉडक्शन हाउसला भुरळ पाडली आहे आणि ती लवकरच चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. मात्र कावेरीला तिच्या प्रोजेक्टबद्दल गुप्तता बाळगायची आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कावेरी एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी चर्चेत आहे. ज्यातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते. कावेरी वर्कशॉपमध्येही सहभागी झाली आहे आणि तिच्या भूमिकेची तयारी करत आहे. असे म्हटले जात आहे की, कावेरी लवकरच एका मोठ्या चित्रपटाची घोषणा करु शकते.
सुचित्रा आणि शेखर झाले विभक्त
कावेरी कपूर शेखर कपूर आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांची मुलगी आहे. सुचित्रा आणि शेखर यांचा विवाह १९९७ मध्ये झाला होता. या दोघांचे लग्न जवळपास १० वर्षे टिकले. दोघांमधील काही मतभेदांमुळे त्यांनी २००७ मध्ये एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.