पूजा सामंत - मुंबई चतुरस्र अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या ३0 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक यादगार भूमिका केल्यात. कधी खलनायक, कधी सहनायक तर कधी कॉमेडीयन. त्यांच्या कारकिर्दीचा चढता आलेख नामांकित नायकांना लाजवणारा असला तरी त्यांनी आपला अभिनेत्याचा अंगरखा उतरवला असून, ते आता पत्रकाराच्या भूमिकेत प्रत्यक्षात शिरले आहे! होय, अनुपमने निर्मात्याच्या रूपात 'कुछ भी हो सकता हैं' या चॅट शोची निर्मिती केली असून, ते बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कलाकारांशी गप्पा मारत त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहेत. अर्थात त्यांनी पत्रकाराची भूमिका स्वत:कडे घेतली आहे. कलर्स वाहिनीवर दर रविवारी रात्री ८ वाजता अनुपम त्यांचा हा चॅट शो सादर करणार आहे . त्यानिमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत अनुपमने त्यांच्या शोचे स्वरूप तर सांगितलेच, शिवाय आठवणींच्या प्रवासाबद्दल बोलताना हा काश्मिरी अभिनेता खूपसा भावुक झालेला दिसला. कलर्सचे सीईओ राज नायक यांनी अनुपम खेरसंदर्भात छोटीशी बातचीतदेखील केली. अनुपम सांगतात, बॉलीवूडमधील बहुतेक कलाकारांसमवेत मी सिनेमे केलेत. अनेकांशी मित्रत्व निर्माण झाले. याच दरम्यान लक्षात आलं, अनेक स्टार्स असे आहेत, ज्यांच्या जीवनावर, त्यांच्या संघर्षावर सिनेमा, पुस्तक निघू शकेल. शाहरूख-अक्षय कुमार, विद्या बालनसारखे आजचे आघाडीचे स्टार्स ज्यांना ब्रेक देण्यासाठी बॉलीवूडने पायघड्या घातल्या नव्हत्या, त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. असे स्टार्स ज्यांचे जीवन सर्वसामान्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे, असे स्टार्स 'कुछ भी हो सकता हैं'मध्ये माझ्याशी आपले कटू अनुभव शेअर करतील. कसलीही भीडभाड न बाळगता आपल्या संघर्षमयी जीवनातील टक्के-टोणपे प्रेक्षकांना सांगतील. अनुपमचा शो असल्यामुळे कुणाही कलाकाराने शोमध्ये येण्यास नकार दिला नाही आणि अनुपमपुढे आपली खडतर-काटेरी यशोगाथा प्रामाणिकपणे मांडली. शोच्या पहिल्या भागात शाहरूख खानबद्दल अशा अनेक घटना समजणार आहेत, ज्याबद्दल शाहरूखसमवेत सिनेमे केलेल्या अनेकांना कल्पना नाही! अनुपम यांनी शाहरूख खानचे खरे नाव काय असे विचारले आणि त्याचे खरे नाव अब्दुल रेहमान आहे असे सांगितल्यावर आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते. अतिशय बुद्धिमान मानला जाणारा शाहरूख आपल्या आईबाबत अतिशय हळवा आहे, असे सांगत अनुपम म्हणाले, शाहरूखला कुणीतरी सांगितले की आपली प्रिय व्यक्ती आजारी असताना केलेली प्रार्थना (नमाज) अखंडितपणे करायची असते. त्यामुळे त्याची आई 'आयसीयू'मध्ये असताना शाहरूख हॉस्पिटलमध्ये येताना आईला उतार पडावा म्हणून दुआ मागू लागला आणि तितक्यात त्याला डॉक्टरांनी बोलावल्याचा निरोप आला. त्या वेळेस तो पार्किंगमध्ये आपल्या आईसाठी दुआ मागत होता आणि दुआ पूर्ण झाल्याशिवाय त्याला तिथून जायचे नव्हते! पण तातडीने बोलावल्यामुळे तो अम्मीकडे गेला आणि तिची प्राणज्योत मालवली! विद्या बालनने आपल्या संघर्षगाथेत सांगितले, तिला एकूण २0 सिनेमांतून निर्मात्यांनी काढले आणि म्हणूनच परिणिता सिनेमाआधी विद्या बालनला अपशकुनी असे नाव पडले! अपशकुनातून - शुभशकुनी अभिनेत्री असा विद्याचा प्रवास घडल्याचे अनुपम सांगतात. महेश भट्ट आणि त्याची लेक आलिया भट्ट, डेव्हिड धवन आणि त्याचा मुलगा वरु ण धवन, ओम पुरी-नसिरुद्दीन शहा अशा अनेक दिग्गजांना पत्रकारांप्रमाणे बोलते करीत अनुपम यांनी शोमध्ये रंगत निर्माण केली आहे! प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग याच्याशी झालेली बातचीत अतिशय प्रेरणादायी ठरली आहे, कारण कर्करोगावर विजय मिळवून त्याची बॅट पुन्हा मैदानात तळपू लागली! पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण - अनुपम खेर आणि त्यांची पत्नी खासदार किरण खेर भाजपाचे सर्मथक आहेत. मग नरेंद्र मोदींना आवतण देत त्यांची संघर्षगाथा पहिल्याच भागात दाखवणे अधिक संयुक्तिक झाले नसते का, या प्रश्नावर अनुपम खेर म्हणाले, मोदीजींकडे वेळ नाही; शिवाय त्यांनी मला 'कुछ भी हो सकता हैं' असे शीर्षक न ठेवता 'सब कुछ हो सकता हैं' असे सुचवले आहे! - असो. त्यांनी माझ्या शोच्या दुसर्या पर्वात येण्याचे आश्वासन दिले आहे. पहिल्या पर्वात अमिताभ बच्चन यांनी वेळेअभावी नकार दिला असला तरी मोदीजींप्रमाणे दुसर्या पर्वात आपली कष्टमय अभिनययात्रा ते सांगणार आहेत! |