'अनुपमा' मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा करंट लागल्याने एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 02:45 PM2024-11-16T14:45:52+5:302024-11-16T14:49:41+5:30
'अनुपमा' मालिकेच्या सेटवर मोठा अपघात झाला असून धक्कादायक बातमी समोर येतेय.
स्टार प्लसवर सुरु असलेली 'अनुपमा' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेसंबंधी एक मोठी अपडेट समोर येतेय. ती म्हणजे वीजेचा करंट लागल्याने मालिकेच्या सेटवर एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. 'अनुपमा'च्या सेटवर काम करणाऱ्या असिस्टंट लाईटमॅनचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची गोष्ट घडलीय. १४ नोव्हेंबरला ही घटना घडली असून यामुळे सेटवर सर्वांनाच धक्का बसलाय.
काय घडलं नेमकं?
या घटनेसंबंधी 'अनुपमा' मालिकेच्या मेकर्सनी अधिकृत वक्तव्य अजून दिलं नाहीय. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'अनुपमा' मालिकेचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होता. त्यावेळीच सेटवर उपस्थित असलेल्या असिस्टंट लाईटमॅनला विजेचा करंट लागला. त्यामुळे त्वरीत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी आरे कॉलनी पोलीस ठाण्यात पोलिसांनी FIR दाखल केलाय. सध्या पोलीस सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाची चौकशी करत आहेत. सध्या 'अनुपमा' मालिकेतील प्रमुख अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलीय. याशिवाय काही दिवसांपूर्वी वनराजची भूमिका साकारणाऱ्या सुधांशू पांडेने मालिका सोडली होती. त्यामुळेही 'अनुपमा' मालिका चांगलीच चर्चेत आहे.