Abhay Deol, Anurag Kashyap : “तो एक नंबरचा खोटारडा आणि...”; अनुराग कश्यपवर भडकला अभय देओल, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 04:52 PM2023-01-22T16:52:11+5:302023-01-22T16:53:33+5:30
Abhay Deol, Anurag Kashyap : अभयने एका जुन्या वादावर मौन सोडलं आहे. वाद आत्ताचा नाही तर अडीच वर्षांपूर्वीचा आहे...
Abhay Deol, Anurag Kashyap : आपल्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत राहणारा अभिनेता अभय देओल सध्या त्याची आगामी वेब सीरिज ‘ट्रायल बाय फायर’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सध्या मात्र या सीरिजची नाही तर अभयने दिग्दर्शक अनुराग कश्यपबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे. अनुराग कश्यप अनुराग कश्यप एक नंबरचा खोटारडा आणि विषारी माणूस आहे, असं म्हणत अभयने एका जुन्या वादावर मौन सोडलं आहे. आता हे काय प्रकरण आहे, हे जाणून घेऊ यात. तर वाद आत्ताचा नाही तर अडीच वर्षांपूर्वीचा आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तर 2020 मध्ये एका मुलाखतीत अनुराग कश्यपने अभय देओलसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला होता. अभयसोबत काम करणं अत्यंत कठीण आणि त्रासदायक असल्याचं त्याने म्हटलं होतं. “अभयसोबत काम करण्याचा माझा अनुभव चांगला नाही. देव डीच्या सेटवर त्याचं वागणं ठीक नव्हतं. तो देओल असल्याचा फायदा घेत होता. तो एकटा शूटिंगच्या वेळी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होता. याऊलट संपूर्ण टीम पहाडगंजमध्ये एका साध्या हॉटेलात राहत होती. जेणेकरून कमी बजेटमध्ये चित्रपट शूटिंग करता येईल. याच कारणामुळे अनेक दिग्दर्शक त्याच्यापासून चार हात लांबच राहतात”, असं अनुराग म्हणाला होता.
आता अडीच वर्षांनंतर अभयने या आरोपांवर उत्तर दिलं आहे.
काय म्हणाला अभय?
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अभय देओल बोलला. अनुराग कश्यपने केलेल्या आरोपांना त्याने उत्तर दिलं. तो म्हणाला,“अनुराग माझ्याबद्दल बरंच काही खोटं बोलला आहे. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची मागणी मी केली नव्हती. तो स्वत:हून माझ्याकडे आला होता आणि म्हणाला की तू आमच्यासोबत राहू शकत नाही, कारण तू देओल आहेस. मी आजपर्यंत याविषयी कधीच बोललो नाही. कारण आयुष्य खूप छोटं आहे. त्यामुळे मला माझ्या आयुष्यात अशी टॉक्सिक विषारी व्यक्ती नकोय. अनुराग कश्यप अत्यंत खोटारडा आणि विषारी माणूस आहे. अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला मी देईन. २०२० मध्ये त्या मुलाखतीत तो जे काही बोलला, त्यानंतर त्याने मला माफीचा मॅसेज केला होता. यार, माझा दिवस खराब होता. मला माफ कर, माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता, असं तो म्हणाला होता. त्यावेळी जा, मी तुला माफ केलंय, कारण मला काहीही फरक पडत नाही, असं मी त्याला म्हणालो होतो.”