कतरिना कैफ आणि विकी कौशलचे आहे का अफेअर? नेहा धुपियाने केला यावर खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 03:10 PM2019-05-08T15:10:22+5:302019-05-08T15:12:10+5:30
नेहा धुपियाने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून ती सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या चॅट शो साठी जास्त चर्चेत आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल नात्यात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत. पण या दोघांनीही या अफवांविषयी मौन राखणेच पसंत केले आहे. त्यांच्या नात्याविषयी नेहा धुपियाने नुकताच खुलासा केला आहे.
नेहा धुपियाने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून ती सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या चॅट शो साठी जास्त चर्चेत आहे. नेहा धुपियाच्या कार्यक्रमात आजवर अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली असून या सेलिब्रेटींनी नेहासोबत आपले अनेक सिक्रेट या कार्यक्रमात शेअर केले आहेत. तसेच या कार्यक्रमात प्रचंड धमाल मस्ती देखील केली आहे. नेहाच्या या शोचा सध्या तिसरा सिझन सुरू आहे. या सिझनचे चित्रीकरण नुकतेच संपले. या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी झळकणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेहा धुपियाने नुकतीच पिंकव्हिला या वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या कार्यक्रमाविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत ते रॅपिड फायर राऊंडदेखील खेळले. त्यावेळी नेहाला तिच्या चॅट शोच्या चित्रीकरणादरम्यानचे काही सिक्रेटदेखील विचारण्यात आले. सेटवर सगळ्यात कमी नाटकं कोणी केली असे विचारले असता तिने लगेचच कतरिना असे सांगितले. त्यावर कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यात अफेअर सुरू आहे का? त्यांच्या डेटिंगविषयी सुरू असलेली चर्चा खरी आहे का असे विचारले असता नेहाने दोनदा डोळे मिचकावत ही गोष्ट खोटी असल्याचे सांगितले.
नेहाने या मुलाखतीत तिच्या बॉलिवूडमध्ये परतण्याविषयी देखील भाष्य केले. नेहाने या मुलाखतीत सांगितले की, ती लवकरच चित्रपटांमध्ये परतणार आहे. ती तिच्या फिटनेसवर लक्ष देणार असून तिला तिच्या पूर्वीच्या फिगरमध्ये परतायचे आहे. त्यानंतरच ती चित्रपटांमध्ये काम करण्याचा विचार करणार आहे. सध्या ती तिचे काम आणि कुटुंब यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. नेहा आणि अंगद बेदी यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस लवकरच येणार असून त्यांची मुलगी मेहेरसोबत ते वाढदिवस साजरा करणार आहेत.