कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 08:50 PM2024-11-28T20:50:38+5:302024-11-28T20:51:59+5:30
Art Director Late Nitin Chandrakant Desai, ND Studio Goregaon Film City: सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केली स्टुडिओची पाहणी
Art Director Late Nitin Chandrakant Desai, ND Studio Goregaon Film City: कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:चे जीवन संपवणारे प्रसिद्ध कलादिग्दर्शक दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडिओ आता गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात देण्यात आला आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी (operations) स्टुडिओचा ताबा घेतला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी स्टुडिओला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील कामकाजाची पाहणी केली. आता एन.डी. स्टुडिओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
या पाहणी दौऱ्याकरीता महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, उप सचिव महेश व्हावळ, मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उप अभियंता ( स्थापत्य ) विजय बापट, विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते. राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने ( NCLT ) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सादर केलेल्या Resolution Plan ला १४ नोव्हेंबर २०२४ रोजी मान्यता दिल्याने यापुढे एन. डी. स्टुडिओचे दैनंदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखा विषयक कामे शासनाच्या वतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरु राहणार आहेत. हे सर्व कामकाज जाणून घेण्यासाठी खारगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एन. डी. स्टुडिओची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच येथील कार्यरत असलेल्या व्यवस्थापनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
विशेष कृती पथकाची स्थापना
प्रशासकीय आणि विकासात्मक कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक यांच्या सनियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये सह व्यवस्थापकीय संचालक समन्वयक, विशेष कार्यकारी अधिकारी उप समन्वयक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्यलेखावित्तधिकारी, व्यवस्थापक कलागारे, उप अभियंता ( स्थापत्य ), उप अभियंता (विद्युत) आदि अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तसेच वित्तीय, विधी, आयटी, मनुष्यबळ आदि क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांचा देखील समावेश आहे. सद्यस्थितीमध्ये व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर आणि विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील प्रशासकीय कामकाज पाहणार आहेत, अशी दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजे गोरेगाव फिल्मसिटीच्या माहिती जनसंपर्क विभागाने दिली.