Nitin Desai प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या, सिनेसृष्टी हादरली!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 10:09 AM2023-08-02T10:09:44+5:302023-08-02T11:33:45+5:30
Art director Nitin Desai commits suicide ended his life at his ND studio near karjat इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओतच आपलं जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास केला जात आहे. रायगडचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्राथमिक माहिती दिली की, 'आज सकाळी श्री नितीन देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकताना ND स्टुडीओमध्ये आढळून आला आहे. आम्ही सर्व पैलू तपासून पाहत आहोत.'
नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. 2005 साली हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असा भव्य 'एनडी स्टुडिओ' त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं. 'परिंदा', 'डॉन', 'लगान', 'देवदास', 'जोधा अकबर', 'हम दिल दे चुके नम' अशा अनेक भव्य सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं. तर 'बालगंधर्व' सारख्या मराठी सिनेमाचंही कलादिग्दर्शन केले. 'देवदास','खामोशी' या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
नितीन देसाई यांचा जन्म दापोली येथे झाला. त्यांनी मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालयातून प्रशिक्षण घेतले. तर 1987 पासून त्यांनी कलाविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली. 1993 साली आलेल्या अधिकारी ब्रदर्सच्या 'भूकंप' सिनेमातून त्यांनी सुरुवात केली. मात्र 1994 साली आलेल्या '1942 अ लव्ह स्टोरी' या सिनेमामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. आज 2 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याने हा कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.