हे कलाकार साऊथमध्ये हिट; बॉलिवूडमध्ये फ्लॉप!
By Admin | Published: May 8, 2017 05:38 AM2017-05-08T05:38:12+5:302017-05-08T05:38:12+5:30
‘बाहुबली’सारख्या सुपरहिट चित्रपटात ‘अवंतिका’ नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया ही बॉलिवूडमध्येही नशीब अजमावत
- Satish Dongare -
‘बाहुबली’सारख्या सुपरहिट चित्रपटात ‘अवंतिका’ नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया ही बॉलिवूडमध्येही नशीब अजमावत आहे; परंतु अद्याप तिला हवे तसे यश मिळालेले नसल्याचे दिसून येते. आतापर्यंत तमन्नाने ‘हिम्मतवाला, हमशक्ल, एंटरटेनमेंट’ यासारख्या चित्रपटांमध्ये अक्षयकुमार, अजय देवगण आणि सैफ अली खान यासारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले; परंतु तिला हवे तसे यश मिळाले नाही. तमन्नाप्रमाणे इतरही काही साउथ अभिनेत्री आहेत, ज्या साऊथमध्येही हिट ठरल्या; परंतु बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरल्या आहेत.
भूमिका चावला
‘दबंग स्टार’ सलमान खानसोबत ‘तेरे नाम’ या चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री भूमिका चावला सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये स्थिर होणार, असेच काहीसे चित्र दिसत होते. कारण भूमिकाने ‘रन, दिल ने जिसे अपना कहा, सिलसिले, दिल जो भी कहे, फॅमिली, गांधी माय फादर, लव यू आलिया’ या चित्रपटांमध्ये कसदार अभिनयाची झलक दाखविली. परंतु, अशातही तिला बॉलिवूडमध्ये म्हणावे तस यश मिळाले नाही. २०१६मध्ये आलेल्या ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटांमध्ये ती झळकली होती. भूमिकाने २०००मध्ये आलेल्या ‘युवाकुडू’ या तेलगू चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती.
मधुरिमा तुली
३१ वर्षीय मधुरिमा तुली हिने ‘बचना ये हसिनों’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पुढे ती ‘टॉस, क्या करें क्या ना करें, कालो, बेबी’ या चित्रपटांमध्ये झळकली; परंतु अजूनही बॉलिवूडमध्ये पुरेसे यश मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. २००४मध्ये आलेल्या ‘साईकिरण’ या तेलगू चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती.
तृषा कृष्णन
२०१०मध्ये आलेला अक्षयकुमार स्टारर ‘खट्टा-मीठा’ हा चित्रपट तुम्हाला आठवतो का? या चित्रपटात अक्षयकुमारसोबत साउथ अभिनेत्री तृषा कृष्णन हिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर मात्र ती बॉलिवूडमधून गायबच झाली आहे. साऊथमध्ये अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली तृषा बॉलिवूडमध्ये मात्र फारसा करिष्मा दाखवू शकली नाही. तृषाने १९९९मध्ये ‘जोडी’ या तेलगू चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती.
श्रेया सरन
‘तुझे मेरी कसम’ या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या श्रेया सरन हिला साउथप्रमाणे बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. तिने ‘आवारापन’, ‘दृश्यम्’ या चित्रपटांमध्ये काम केले; मात्र त्यात ती फारशी यशस्वी ठरली नाही. श्रेया आजही बॉलिवूडमध्ये एका हिटच्या शोधात आहे. तिने २००१मध्ये ‘इष्टम्’ या तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
काजल अग्रवाल
३१ वर्षीय काजलने बॉलिवूडमध्ये ‘क्यों... हो गया ना’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. पुढे ती ‘सिंघम्, स्पेशल २६’ या चित्रपटांमध्ये बघावयास मिळाली. मात्र, अशातही तिला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. साऊथमध्ये काजलच्या नावे अनेक हिट चित्रपटांची नोंद आहे. तिने २००७मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम्’ या तेलगू चित्रपटातून डेब्यू केला होता.
श्रुती हसन
‘लकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या श्रुतीने ‘दिल तो बच्चा है जी’, ‘रमैय्या-वस्तावैय्या’, ‘डी-डे’, ‘गब्बर इज बॅक’, ‘वेलकम बॅक’ आदी बॉलिवूडपटांमध्ये काम केले आहे. मात्र, अजूनही ती एका हिटच्या शोधात आहे. आगामी काळात ती अभिनेता राजकुमार राव याच्याबरोबर ‘बहन होगी तेरी’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटामुळे ती चांगलीच चर्चेत आहे.
रम्या कृष्ण
‘बाहुबली’मधील राजमाता शिवगामी देवीची भूमिका साकारणारी रम्या कृष्ण हिने १९८८मध्ये आलेल्या ‘दयावान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर ती ‘बनारसी बाबू, लोहा, चाहत, परंपरा, वजूद’ यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये झळकली. मात्र, अशातही तिला बॉलिवूडमध्ये स्वत:ची फारशी ओळख निर्माण करता आलेली नाही. १९८५मध्ये तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात करणारी रम्या आता पुन्हा एकदा ‘बाहुबली-२’मुळे चर्चेत आली आहे.