एक आर्टिस्ट, दोन भूमिका अन् भिन्न ‘अवतार’
By Admin | Published: April 16, 2016 02:03 AM2016-04-16T02:03:10+5:302016-04-16T07:49:40+5:30
शाहरूख खान याचा ‘फॅन’ हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. ‘गौरव’ म्हणजे या चित्रपटातील मध्यवर्ती पात्र. ‘फॅन’ला सर्वाधिक प्रसिद्धी मिळवून दिली ती याच पात्राने. वयाची पन्नाशी गाठलेल्या
- प्रगत तंत्रज्ञानामुळे पन्नाशीचा किंग खान चक्क विशीत
शाहरूख खान याचा ‘फॅन’ हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. ‘गौरव’ म्हणजे या चित्रपटातील मध्यवर्ती पात्र. ‘फॅन’ला सर्वाधिक प्रसिद्धी मिळवून दिली ती याच पात्राने. वयाची पन्नाशी गाठलेल्या शाहरूखने या चित्रपटात चक्क २४ वर्षांच्या गौरवची भूमिका साकारली आहे. गौरवचा लूक हाच या चित्रपटातील प्लस पॉइंट ठरला आहे. प्लस पॉइंट यासाठी की, हे लूक प्रत्यक्षात पडद्यावर आणण्यासाठी २५० जणांची टीम अहोरात्र खपली. गौरवच्या लूकसाठी शाहरूखने अमेरिकेत जाऊन ३ डी स्कॅनिंग केली. शाहरूखच्या खऱ्या आयुष्यातील १०० चाहत्यांच्या छायाचित्रांचा अभ्यास करून गौरवचे लूक तयार केले गेले. आॅस्कर पुरस्कार विजेता मेकअप आर्टिस्ट ग्रेग कॅनम याने शाहरूखला गौरवचा लूक दिला. तशी ही टेक्नॉलॉजी बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा वापरली गेली असे नाही. याआधीही चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणाऱ्या कलावंतांच्या दोन इतक्या भिन्न प्रतिमा प्रेक्षकांसमोर आल्या की त्यातल्या एकाला पहिल्याच क्षणी ओळखणेही कठीण झाले. डबल रोल आॅफ डिफरन्ट ‘अवतार’मध्ये झळकलेल्या अशाच काही चित्रपटांवर एक नजर...
आखरी रास्ता
अमिताभ बच्चन यांचा एक दुहेरी भूमिका असलेला चित्रपटही खूप गाजला होता. ‘आखरी रास्ता’ असे त्याचे नाव होते. सुडाच्या अग्नीत होरपळणारा गुन्हेगार पिता व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असलेला मुलगा यांच्यातील द्वंद या चित्रपटात दाखवण्यात आले होते. यात अमिताभ याचा पित्याच्या भूमिकेतील लूक खरंच पाहण्यासारखा होता. ते या चित्रपटात खूप वयस्कर दिसतात. वाढलेली दाढी आणि कपाळभर पसलेले केस अशा अवतारात ते पडद्यावर पहिल्यांदा दिसले तेव्हा त्यांचे खरे वय लक्षातच येणार नाही इतका प्रभावी गेटअप त्यांनी साकारला होता.
तनू वेड्स मनू रिटर्न
नुकताच येऊन गेलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील. तनू वेड्स मनू रिटर्न या चित्रपटात कंगना राणावत डबल रोलमध्ये दिसली. यातील तिने साकारलेल्या ‘दत्तो’चा लूक एकदम भन्नाट होता. अर्थात हा लूक काही सहज मिळाला नव्हताच. दत्तोच्या लूकसाठी अनेक ट्रायल घेण्यात आल्या. केसांचे अनेक विग आणि दातांच्या कवळी ट्राय केल्या गेल्या. अनेक कवळ्या ट्राय केल्या गेल्यानंतर दत्तोचा लूक फायनल झाला. या लूकसाठी हरियाणाच्या लोकल मार्केटच्या अनेक फेऱ्या घालण्यात आल्या आणि हरियाणवी मुली व अॅथलेट्सचे निरीक्षण केल्यानंतर पोशाख तयार करण्यात आला. कंगनानेही यासाठी हरियाणाच्या मुलींच्या देहबोलीचा खास अभ्यास केला.
अप्पू राजा
चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता कमल हसन म्हणजे चित्रपटसृष्टीतील नवनवे प्रयोग करणारे व्यक्तिमत्त्व. कृत्रिम अवयवासह केलेला कृत्रिम मेकअप, कृत्रिम कातडी लावून चेहऱ्याची ठेवण बदलणे असे अनेक प्रयोग करून आपल्या चित्रपटांमध्ये डिफरन्ट लूक आणण्याचे प्रयत्न कमल यांनी केले. टेक्नॉलॉजी पुरती अॅडव्हान्स नसतानादेखील कमल हसन यांनी आपल्या चित्रपटांमध्ये डिफरन्ट लूक ट्राय केला आहे. ‘अप्पू राजा’, ‘दशवतारम’ या चित्रपटांमध्ये डिफरन्ट लूकमध्ये ते दिसले. ‘दशवतारम’मध्ये तर कमल दहा वेगवेगळ्या अवतारात दिसले. अप्पू राजा हा कमलच्या तामिळ चित्रपटाचा रिमेक़ यात त्यांनी मॅकेनिक, सर्कसमधील ठेंगणा विदूषक आणि पोलीस अधिकारी अशा तीन आणि त्याही वेगवेगळ्या लूकमधील भूमिका साकारल्या. त्या काळी आजच्याइतके तंत्रज्ञान प्रगत नसल्याने ठेंगण्या अप्पूची भूमिका साकारण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या गेल्या. म्हणजे स्ट्रेट अँगल शॉट्ससाठी कमलच्या मुडपलेल्या गुडघ्यावर फिट बसतील, असा बुटाचा एक वेगळा जोड बनवण्यात आला.
रोबोट
‘रोबोट’ या चित्रपटात तामिळ मेगास्टार रजनीकांत यांचा डबल रोल विद डिफरन्ट लूक आठवतोय का? यातील रोबोटच्या भूमिकेतील रजनीकांत अगदी वेगळे भासत होते. ‘रोबोट’मधील रजनीकांतचा ‘चिट्टी’च्या ‘विलेन’लूकसाठी कुठलाही कृत्रिम अवयवाचा वापर करण्यात आला नाही. रजनीकांत यांना शूटिंगदरम्यान त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र डोळ्यांसाठी कलर लेन्स, कॉपर सूट, त्यांच्या केसाच्या विगमध्ये सिल्व्हर कलरचा पॅच होता, त्यासाठी तर चक्क याकचे केस वापरले गेले. या भारी मेकअपसह रजनीकांत पडद्यावर आले प्रेक्षकांनी त्यांच्या या लूकला अक्षरश: डोक्यावर घेतले.
- rupali.mudholkar@lokmat.com