गणरायाच्या सेवेत कलावंतही दंग

By Admin | Published: September 22, 2015 12:12 AM2015-09-22T00:12:53+5:302015-09-22T09:22:54+5:30

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाने अवघे जण लाडक्या बाप्पाच्या सेवेत रुजू झाले आहेत. अनंत चतुर्दशीपर्यंत हेच चित्र कायम राहणार आहे

The artist's contribution in the service of Ganaraya | गणरायाच्या सेवेत कलावंतही दंग

गणरायाच्या सेवेत कलावंतही दंग

googlenewsNext

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाने अवघे जण लाडक्या बाप्पाच्या सेवेत रुजू झाले आहेत. अनंत चतुर्दशीपर्यंत हेच चित्र कायम राहणार आहे. लहानग्यापासून मोठ्यांपर्यंत आणि सर्वसामान्यांपासून सेलीब्रिटी मंडळींपर्यंत सर्वजण बाप्पामय झाले आहेत. व्यक्ती आणि स्थळ वेगवेगळी असले तरी बाप्पाविषयीची आत्मियता सर्वत्र सारखीच आहे. तोच मोदकांचा नैवद्य, तीच आरास, त्याच आरत्या, एकूणच सर्वत्र माहोल तोच आहे. प्रथा आणि परंपरा जपत अलीकडे गणेशोत्सवाने पर्यावरणस्नेही होण्यापर्यंत वेगळी वाट चोखाळली आहे. चमचमणाऱ्या दुनियेत वावरणाऱ्या कलावंतांचाही बाप्पा तितकाच लाडका आहे. असेच काही कलावंत सांगताहेत लाडक्या बाप्पाविषयी.
गणपती ही बुद्धीची देवता आणि सर्व कार्यांचा आरंभबिंदू असतो. संकटमोचक म्हणूनही आपण गणपतीची आराधना करतो. महाराष्ट्राचा हा आवडता सण आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. विविध शिबिरे राबवली जातात. अनेक मंडळे एखादे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गणेशोत्सवात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. यंदा दुष्काळाचा प्रश्न समोर आहे आणि बहुतेक मंडळे त्यासाठी काही ना काही तरी करीत आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आमच्या घराण्याचा गणपती काकांकडे असतो आणि मी तिथे हटकून जातो. मित्रांच्या घरीसुद्धा मी दर्शनाला जातो. माझ्या नाटकांचे दौरे सांभाळून माझा गणेशोत्सव साजरा होतो.
- संजय नार्वेकर
आमच्याकडे माझ्या जन्मापासून घरी गणपती आला. मी गर्भात असताना आमच्याकडे काम करणाऱ्या ज्या बाई होत्या, त्या म्हणाल्या होत्या की बार्इंना जर का मुलगा झाला तर मी गणपती बसवीन. माझा जन्म झाला आणि पहिल्या वर्षी त्यांनीच घरी गणपती बसवला. माझ्या आईला त्याचे फार अप्रूप वाटले. तेव्हापासून आमच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पा येऊ लागले. अलीकडे मी ज्या ठिकाणी विसर्जन करायला जायचो, तिथली अवस्था फारच गंभीर असल्याचे जाणवले. त्यामुळे मी कायमस्वरूपी संगमरवराची मूर्ती आणली आहे. वर्षभर ती आमच्या घरी असते आणि गणेश चतुर्थीला तिची प्रतिष्ठापना केली जाते. मूर्ती कायमस्वरूपी असते. सुपारी व निर्माल्याचे विसर्जन आम्ही करतो
- गिरीश ओक
माझ्या बहिणीकडे गणपती येतो आणि तो आम्हा सर्वांचा लाडका असतो. मी तर त्याला ‘बाप्पुडी’ असेच म्हणते. तो माझी मैत्रीणही असतो आणि मित्रही असतो. गणपती घरी येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहात असतो. या गणपतीची आरास, सजावट करण्याचे काम माझ्याकडे असते. पहिल्या दिवशीचा ‘बाप्पुडी’चा २१ मोदकांचा नैवद्य मीच करते. यासाठी कुठून बळ येते ते कळत नाही. पण हे सगळं कार्य हातून पार पडते खरे. आरत्यांना कुणाचा आवाज मोठा लागेल याची चुरस असते. गणपतीच्या दिवसांत आपण कोण आहोत, हेच विसरायला होते.
- नंदिनी वैद्य-रेगे
अनेक मित्रमंडळी आमच्याकडे गणपतीला येतात. शाळेतले, कॉंलेजमधले असे मित्र-मैत्रिणी यानिमित्ताने तरी एकत्र येतात. गेली १० वर्षे आम्ही इकोफ्रेंडली गणपती आणतो. आम्ही आता चांदीची मूर्ती घेतली आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि ही बुद्धी वापरून आपणच पर्यावरणाचे भान ठेवायला हवे. गणपतीची चांदीची मूर्ती आणण्याच्या अतुलच्या निर्णयाला घरातून सर्वांनीच सहमती दर्शवली. आमच्याकडे गणपतीला मोदक तर असतातच; पण विसर्जनाच्या दिवशी आमच्याकडे आंबेडाळ करण्याची परंपरा आहे. नव्या उभारीने काही करण्याची ताकद गणपती देतो.
- सोनिया परचुरे
शाळेत असताना गणेशोत्सव हा आनंदाचा भाग असायचा. कारण त्यानिमित्ताने सात दिवस मजा करता यायची. खूप चांगले कार्यक्रम त्यावेळी व्हायचे. आता मात्र हे स्वरूप बदलले आहे. दोन-चार ओळखीच्या ठिकाणी मी आता गणपतीला जातो; पण हल्ली एकूणच कलकलाट वाढला आहे. ज्या कारणासाठी सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली, तो उद्देश सफल झाला का हा प्रश्न आहे. मुळात सार्वजनिक गणपतीची गरज आहे का, असेही वाटते़ कारण हल्ली सगळ्यांकडे गणपती असतो. त्यामुळे वेगळ्या सार्वजनिक गणपतीची काही गरज आहे, असे वाटत नाही. - संजय मोने

Web Title: The artist's contribution in the service of Ganaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.