Ram Mandir: अयोध्येला जाऊनही 'प्रभू राम' दर्शनाविनाच परतले, म्हणाले- या क्षणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 04:31 PM2024-01-24T16:31:19+5:302024-01-24T16:32:19+5:30
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू राम नाराज! अरुण गोविल म्हणाले...
अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा संपूर्ण जगाने पाहिला. विविध क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती. रामायण मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अरुण गोविलही या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी अयोध्येला गेले होते. पण, राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर अरुण गोविल नाराज झाल्याचं समोर आलं आहे.
अरुण गोविल हे दीपिका चिखलीया आणि सुनील लहरी यांच्यासोबत अयोध्येला गेले होते. रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेतून या तिघांनाही लोकप्रियता मिळाली. लोकांच्या मनात त्यांची आजही राम, लक्ष्मण आणि सीता अशी छबी आहे. त्यामुळेच त्यांना अयोध्येत पाहून चाहतेही खुश होते. अयोध्येत त्यांचं जंगी स्वागतही करण्यात आलं होतं. प्राणप्रतिष्ठापनेच आमंत्रण मिळाल्याने आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होता येणार असल्यामुळे अरुण गोविल यांनी आनंद व्यक्त केला होता. पण, राम मंदिरा प्राणप्रतिष्ठेनंतर मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अयोध्येला जाऊनही रामललाचं दर्शन अरुण गोविल यांना घेता आलं नाही.
'भारत २४'ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "माझं स्वप्न पूर्ण झालं. पण, मला दर्शनच मिळालं नाही. या क्षणी मला काहीच बोलायचं नाहीये." दरम्यान, प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. रामललाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी अयोध्येत पाहायला मिळत आहे.