खोटी माहिती देणारा आपला नेता कसा? नवाब मलिकांचं नाव न घेता megha dhade ची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 12:47 PM2021-10-27T12:47:01+5:302021-10-27T12:48:10+5:30
Megha dhade: समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. या वादामध्ये मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती मेघा धाडे (megha dhade) हिने उडी घेतली आहे.
Cruise Ship Drugs Party: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि नवाब मलिक (nawab malik) यांच्यातील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक सातत्याने पत्रकार परिषदा आणि ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोपाचा धुरळा उडवत आहेत. एवढेच नाही तर समीर वानखेडे यांनी त्यांची वैयक्तिक माहिती लपवत, फसवेगिरी करुन कशा पद्धतीने नोकरी मिळवली हे नवाब मलिक यांनी अनेकदा सांगितलं आहे. सोबतच त्यांच्यावर काही गंभीर आरोपदेखील केले आहेत. मात्र आता या वादामध्ये मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती मेघा धाडे (megha dhade) हिने उडी घेतली आहे. समीर वानखेडे यांना पाठिंबा देत मेघाने अप्रत्यक्षरित्या नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. "सोशल मीडियावरून जी लोकं इतरांची दिशाभूल करत आहेत. किंवा, खोटी माहिती पसरवत आहेत. अशा व्यक्तींना आपण आपले प्रतिनिधी वा नेता म्हणून कसं काय निवडू शकतो?", असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
अलिकडेच मेघाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला असून नवाब मलिक यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
मेघा धाडेचा नवाब मलिकांना अप्रत्यक्षिरित्या टोला
"आज ड्रग्स सर्रास रस्त्यावर विकले जात आहेत. ड्रग्स पेडरलचा सुळसुळाट झाला आहे. शाळा, कॉलेज यांच्याबाहेर पिढीच्या पिढी नासवल्या जात आहेत. आणि, एक सच्चा माणूस हे सगळं संपवण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या माणसाला अशा पद्धतीने त्रास दिला जातोय. ही त्रास देणारी माणसं दुसरी-तिसरी कोणी नसून हा धंदा चालवणारे किंवा या धंद्यातून त्यांचा फायदा होणारे लोकच करच आहेत. हे आपण का समजून घेत नाही? या लोकांना नष्ट करण्यासाठी समीर वानखेडेसारखा ऑफिसर निघाला आहे. पण, त्यांना साथ देण्याऐवजी हे जे लोक त्यांना त्रास देत आहेत त्यांच्या बातम्या आपण बघत बसलोय. जे ट्विटरवर ट्विटरबाजी करत आहेत. किंवा, दुसऱ्या कुठल्या प्रसार माध्यमांना मिस लीड करत आहेत. खोटी माहिती किंवा मनच्या काहीही गोष्टी सांगून समीर वानखेडे करप्ट आणि फ्रॉड माणूस , असं सांगू नत्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांना आपण आपला नेता म्हणून किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कसं काय निवडू शकतो," असं मेघा म्हणाली.
"एक मोठा ऑफिसर आहे जो समाजातील घाण स्वच्छ करतोय आणि एक नेता आहे जो ही घाण करणाऱ्या लोकांना पाठीशी घालायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपल्याला हे ठरवणं किती सोपं आहे की आपण कोणासोबत उभं राहिलं पाहिजे."
दरम्यान, अलिकडेच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांशी संबंध आहेत. तसेच क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया त्याच्या गर्लफ्रेंडसह उपस्थित होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.