'बाळासाहेब असते तर महाराष्ट्रात सोनिया अन् शरद पवारांचं राज्य नसतं'; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं ट्विट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:45 PM2022-06-27T12:45:38+5:302022-06-27T12:46:19+5:30
Ashok pandit: विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरू झालेलं बंड अजूनही सुरू असून आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पक्षात बंड केल्यामुळे राजकारणातील संपूर्ण चित्र पालटून गेलं आहे. विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरू झालेलं बंड अजूनही सुरू असून आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. त्यामुळे या प्रकरणी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मत मांडली आहेत. या प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित (ashok pandit) यांनी या चर्चेमध्ये उडी घेतली आहे.
एकीकडे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटीमध्ये असून ते ठाकरे सरकारविरोधात वक्तव्य करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बंड केलेल्या आमदारांविरोधात पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट करत त्यांचं मत मांडलं आहे.
काय म्हणाले अशोक पंडित?
"जर आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर पालघरमधील साधूंची हत्या करणाऱ्यांना कधीच फाशीची शिक्षा झाली असती. हनुमान चालिसा सगळ्या राज्यात ऐकू आली असती. आणि, सोनिया गांधी, शरद पवार हे महाराष्ट्रावर राज्य करत नसते", असं ट्विट अशोक पंडित यांनी केलं आहे.
शरद पवारांचा शिवसेनेला पाठिंबा
“शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. तसंच 'ही लढाई आपण शेवटपर्यंत लढायची' अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.
दरम्यान, अशोक पंडित यांच्या ट्विटवर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अशोक पंडित यांनी यापूर्वीही अनेकदा समाजात घडणाऱ्या घटनांवर थेट भाष्य केलं आहे. कलाविश्वाप्रमाणेच ते सोशल मीडियावर सक्रीय असून बेधडकपणे त्यांची मत मांडत असतात.