"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 11:41 IST2025-04-18T11:41:02+5:302025-04-18T11:41:54+5:30
अमिताभ बच्चन यांच्या बाजूला माझी खुर्ची... मजेशीर किस्साही वाचा

"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
'सिंघम' फेम अभिनेते अशोक समर्थ (Ashok Samarth) गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहेत. हिंदी, साऊथ आणि भोजपुरी सिनेमांमध्ये ते जास्त सक्रीय आहेत. याशिवाय त्यांनी रंगमंचही गाजवला आहे. हिंदीत त्यांनी महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम केलं आहे. बिग बींसोबत काम करतानाचे अनेक किस्से त्यांनी नुकतेच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
अशोक समर्थ यांनी 'फॅमिली:टाइज ऑफ ब्लड' सिनेमातअमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. याच सिनेमाच्या सेटवरील अमितजींसोबतचे अनुभव त्यांनी सांगितले. 'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' मध्ये दिलेल्या मुलाखतीत अशोक समर्थ म्हणाले, "बच्चन साहेबांसारखी जी थोर माणसं असतात त्यांचा नुसता प्रेझेन्सही तुम्हाला खूप काही शिकवून जातो. एक दोरखंड असतो आणि त्याच्या आतमध्ये बच्चन साहेब असतात. त्यांच्या खूर्चीच्या पाचव्या ते सहाव्या फुटावर माझी खुर्ची असायची. मी त्यांना इतक्या अंतरावर पाहिलं आहे. बँकॉक, मुंबईत अनेक दिवस आमचं शूट होतं. मी कधीच त्यांना प्रश्न विचारायचो नाही. मी कधीच त्यांना डिस्टर्ब केलं नाही. फक्त पाहत राहायचो. त्यांचा ऑरा होता ते असे का आहेत असं मला वाटायचं. अशा थोर माणसांना पाहणं, निरीक्षण करणं, त्यांचं काम बघणं हे मी करत आलो आहे.
एक मजेशीर किस्सा
तिसऱ्या दिवशी त्यांना कळलं की आपल्या पाचव्या फुटावरच कोणीतरी बसलं आहे. त्यांनी वळून पाहिलं आणि पुन्हा पुढे बघून शांत झाले. त्याआधी आमचे सीन झाले होते पण ऑफ कॅमेरा त्यांनी मला पहिल्यांदा नोटीस केलं. चौथ्या दिवशी त्यांनी पुन्हा मला मागे वळून पाहिलं आणि इशारा करुन बोलवलं. मी उठून त्यांच्या जवळ उभा राहिलो. तर ते मला म्हणाले की उभा का आहेस? मग मी माझीच खुर्ची आणायला गेलो आणि नंतर त्यांच्या बाजूला बसलो. तेवढ्यात एक कॉस्च्युम वाला त्यांचं ब्लेझर घेऊन आला. ते ब्लेझर घालण्यासाठी उभे राहिले तर त्या मुलाचा हात काही बच्चन साहेबांच्या खांद्यापर्यंत पोहोचेना. 'हे कोणाला आणलं रे' असं बच्चन साहेब गंमतीत म्हणाले. ते त्या मुलाची मजा घेत होते. मी उठलो आणि ब्लेझर घालणार होतो तर बच्चन साहेब म्हणाले, 'तू नाही, तू कलाकार आहेस. आर्टिस्ट आहे. त्याचं काम तो करेल."
आगीच्या लोळासमोरुन मला बाहेर काढलं
एका सीनमध्ये आम्ही पळत पळत येत असतो. अमितजींना मी पुढे जाऊ देत नाहीच. एका क्षणी ब्लास्ट होतो आणि आगीचे लोळ माझ्यासमोर पडतात. तिथे ते घसरु नये म्हणून बारदंड टाकलेलं असतं. पण तेव्हा माझा पाय नेमका घसरला आणि मी आगीच्या लोळासमोरच पडलो. मी पडल्या पडल्या लगेच अमिताभ बच्चन यांनी माझा हात धरला जे सीन मध्ये नव्हतं. लागलं तर नाही? असं त्यांनी मला विचारलं. मी म्हणालो अजिबात नाही. मग ते म्हणाले, 'हे फाईट मास्ट अतरंगी काहीतरी करतात आपण लक्ष दिलं पाहिजे.'