अशोक सराफ यांच्या मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'अशोक मा.मा.' या दिवसापासून होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 02:39 PM2024-11-19T14:39:17+5:302024-11-19T14:39:57+5:30

'अशोक मा.मा.' या मालिकेतून अशोक सराफ छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत.

ashok saraf new serial ashok mama will be telecast on colors from 25 nov | अशोक सराफ यांच्या मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'अशोक मा.मा.' या दिवसापासून होणार सुरू

अशोक सराफ यांच्या मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'अशोक मा.मा.' या दिवसापासून होणार सुरू

महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ म्हणजेच आपले लाडके अशोक मामा. विनोदाचा बादशहा म्हणून त्यांची ओळख असली तरी हसता हसता डोळ्यांतून पाणी आणणाऱ्या भावना निर्माण करणं ही सुद्धा त्यांची खासियत आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. अशोक मामांनी आजपर्यंत हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेविश्वावर अधिराज्य केलं. २००६ साली ते करत असलेली प्रसिद्ध हिंदी मालिका 'हम पांच' संपली तेव्हा त्यांनी मालिका विश्वाची रजा घेतली. त्यानंतर ते छोट्या पडद्यावर मालिकेमध्ये कधी दिसले नाहीत. पण आज अनेक वर्षांनी अशोक मामांना पुन्हा छोट्या पडद्याने खुणावलं, ते 'कलर्स मराठी'वर येणाऱ्या 'अशोक मा.मा.' या मालिकेने. 

'अशोक मा.मा.' या मालिकेचा विषय ऐकूनच इतके वर्ष टेलिव्हिजनसोबत घेतलेला दुरावा मामांनी संपवायचा ठरवला. एक वेगळा विषय करायला मिळतो आहे म्हणून ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. सुप्रसिद्ध लेखक आणि कलाकार चिन्मय मांडलेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेली 'अशोक मा.मा.' ही मालिका मजेदार, खुमासदार आहे. या मालिकेत अशोक मामांसह 'कलर्स मराठी'च्या 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली रसिका वाखारकर, नेहा शितोळे, चैत्राली गुप्ते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. केदार वैद्य दिग्दर्शित या मालिकेची प्रेक्षकांना आता प्रतीक्षा आहे. 

'कलर्स मराठी'चे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे मालिकेबद्दल म्हणाले,"अशोक मा.मा. या मालिकेच्या माध्यमातून अनेक वर्षांनी मामा आता छोटा पडदा काबीज करणार आहेत. 'अशोक मा.मा.' ही मालिका तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारी तर आहेच पण त्याच सोबत तुमच्या भावनेला हात घालणारी आहे, मनाला स्पर्शून जाणारी आहे. हसवता हसवता डोळ्यातून पाणी आणणारी आहे. दिग्दर्शन, लेखन, कलाकार या सर्व तगड्या गोष्टींचं उत्कृष्ट मिश्रण असणारी ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. मामांना अनेक वर्षानंतर छोट्या पडद्यावर आणण्याचं इंद्रधनुष्य प्रॉडक्शन हाऊसह वाहिनीनेदेखील उचललं आहे. त्यामुळे आमच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी आहे".

रिटायरमेंटच्या वयात असलेले अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे असे अशोक मा.मा. मुंबईत राहत आहेत. त्यांच्या एकाकी आयुष्यात येणारे अनेक इरसाल नमुने आणि त्यांच्या सोबत येणारे अनेक धमाल मजेदार अनुभव आणि त्यातून उलगडत जाणारं अशोक ह्या पात्राच भावविश्व आणि त्याच्या सरळसाध्या आयुष्यात एक असं वादळ येतं ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य ढवळून निघत...हे वादळ काय असतं? त्यामुळे अशोकच्या शिस्तप्रिय आयुष्याला काय कलाटणी मिळते? हे गोष्टी सोबत उलगडत जातं. २५ नोव्हेंबरपासून रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. 

Web Title: ashok saraf new serial ashok mama will be telecast on colors from 25 nov

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.