३२ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ शेअर करत आशुतोष गोवारिकरने लिहिले, मी तेव्हापासून आहे इरफान खानचा फॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 05:49 PM2020-05-05T17:49:51+5:302020-05-05T17:51:26+5:30
दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी इरफानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
इरफान खानच्या अकाली निधनाने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. २९ एप्रिल रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात इरफानने अखेरचा श्वास घेतला. सुमारे आठवडाभरापूर्वी कोलोनच्या संसर्गामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान इरफानने कायमचे साऱ्यांना अलिवदा म्हटले.
इरफानच्या निधनाच्या धक्क्यातून अजून कोणीच सावरलेले नाहीये. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी इरफानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. इरफानने चित्रपटसृष्टीत येण्याआधी अनेक मालिकांमध्ये काम केले होते. आशुतोष गोवारिकर यांनी त्यांच्या १९८८ मध्ये प्रसारित झालेल्या भारत एक खोज या मालिकेतील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत आपल्याला इरफान खानसोबत कुलभूषण खरबंदा यांना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना आशुतोष यांनी लिहिले आहे की, मी श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या मालिकेत काम केले होते. या मालिकेत अकबर आणि बदायूनी यांचा एक सीन मला प्रचंड आवडला होता. बदायूनी साकारत असलेला अभिनेता कोण याची मला कल्पना नसल्याने मी त्यावेळी त्या कलाकाराविषयी विचारले होते. त्यावेळी या कलाकाराचे नाव इरफान खान असल्याचे मला कळले होते. मी तेव्हापासून इरफान खान यांचा खूप मोठा फॅन आहे.
As an actor, I was a part of #DISCOVERYOFINDIA in 1988 by #ShyamBenegal babu! 🙇♂️ One day, I witnessed a scene between #Akbar & his historian BADAYUNI, played brilliantly, by an unknown actor.
— Ashutosh Gowariker (@AshGowariker) May 4, 2020
On asking the asst., I was told – his name is #IrrfanKhan !
Been his #FAN ever since! pic.twitter.com/GXwpcGKQTw
इरफानने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चाणक्य, भारत एक खोज, बनेगी अपनी बात, चंद्रकांता यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. भारत एक खोज ही दूरदर्शनवर दाखवली जाणारी त्याची मालिका त्यावेळी चांगलीच गाजली होती.