अश्विनी भावेचे मराठीत पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2016 03:05 AM2016-02-12T03:05:46+5:302016-02-12T03:05:46+5:30
‘शाब्बास सूनबाई, आहुती, वजीर, एक रात्र मंतरलेली, अशी ही बनवाबनवी, किस बाई किस, हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटांतील ग्लॅमरस अभिनेत्री अश्विनी भावे पुन्हा
‘शाब्बास सूनबाई, आहुती, वजीर, एक रात्र मंतरलेली, अशी ही बनवाबनवी, किस बाई किस, हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटांतील ग्लॅमरस अभिनेत्री अश्विनी भावे पुन्हा एकदा मराठी चित्रपटामधून पुनरागमन करीत आहे. ‘ध्यानीमनी’ या नाटकावर आधारित हा चित्रपट असेल. या चित्रपटात अश्विनी भावे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. अश्विनीने आपल्या कारकिर्दीमध्ये विविध प्रकारच्या भूमिका केल्या. ‘कळत-नकळत’ या चित्रपटाद्वारे पदार्पणातच तिने आपली अभिनयाची चुणूक आणि ग्लॅमरस लूक यांनी वाहवा मिळवली होती. तिच्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. अश्विनीने मराठीबरोबर अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. रणधीर कपूर दिग्दर्शित ‘हीना’ या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न करून ती अमेरिकेला गेली, तरी मराठी चित्रपटसृष्टीला विसरली नाही. २००७ मध्ये ‘कदाचित’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करून तिने आपली मराठीशी बांधिलकी जपली आणि आता ती ‘ध्यानीमनी’ चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत कमबॅक करीत आहे. चला, तर मग तिला तिच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आपण शुभेच्छा देऊ या.