चट मंगनी पट ब्याह! ३९व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, विवाहसोहळ्याचे फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:02 PM2024-12-03T17:02:26+5:302024-12-03T17:02:52+5:30
एका बॉलिवूड अभिनेत्यानेही गुपचूप लग्नाचा बार उडवून दिला आहे. अभिनेत्याने फोटो शेअर करत लग्न केल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
सध्या सगळीकडेच लग्नाचा सीझन सुरू आहे. कलाविश्वातही लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी दिवाळीनंतर मुहुर्त गाठला आहे. तर काही जण बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. एका बॉलिवूड अभिनेत्यानेही गुपचूप लग्नाचा बार उडवून दिला आहे. अभिनेत्याने फोटो शेअर करत लग्न केल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
अॅस्पिरेंट्स फेम बॉलिवूड अभिनेता नवीन कस्तुरीया याने ३९व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. लग्नातील काही खास क्षणांचे फोटो शेअर करत नवीन कस्तुरीयाने ही बातमी चाहत्यांना दिली आहे. पत्नीबरोबर सप्तपदी घेताना आणि भांगात कुंकू भरतानाचे लग्नातील अनमोल आणि अविस्मरणीय क्षण नवीनने शेअर केले आहेत. "चट मंगनी पट ब्याह" असं कॅप्शन या फोटोला त्याने दिलं आहे. त्याच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नवीन कस्तुरीयाने पारंपरिक पद्धतीने लग्न केलं आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्याचा लग्नसोहळा पार पडला. लग्नासाठी त्याने शेरवानी, फेटा असा खास लूक केला होता. नवरदेवाच्या लूकमध्ये तो राजबिंडा दिसत होता. तर त्याच्या पत्नीने भरजरी लेहेंगा परिधान करत दागिन्यांनी साज केला होता.
नवीन कस्तुरीया हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये त्याने काम केलं आहे. मॉडेलिंग करत त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. त्याने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'अस्पिरंट्स' या वेब सीरिजमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. 'कोटा फॅक्टरी', 'TVF पिचर्स' यांसारख्या वेब सीरिजमध्येही तो झळकला आहे.