अभिनयातून स्वत:चे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न

By Admin | Published: April 15, 2016 01:47 AM2016-04-15T01:47:54+5:302016-04-15T01:47:54+5:30

दोन उत्कृष्ट कलाकार एकत्र आले की त्यांची कलाकृती अजरामर होते अन् प्रेक्षकांकडून त्यांच्या अभिनयाला दाद मिळाल्याशिवाय राहत नाही. रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांना

An attempt to preserve itself from acting | अभिनयातून स्वत:चे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न

अभिनयातून स्वत:चे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न

googlenewsNext

दोन उत्कृष्ट कलाकार एकत्र आले की त्यांची कलाकृती अजरामर होते अन् प्रेक्षकांकडून त्यांच्या अभिनयाला दाद मिळाल्याशिवाय राहत नाही. रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांना तर थेट प्रेक्षकांशी सामना करावा लागत असल्यानं त्यांच्या दर्जेदार अभिनयाची पावती लगेचच त्यांना रसिकांच्या टाळ्यांनीच मिळते. असंच एक परिपूर्ण नाटक ‘व्हाइट लिली अ‍ॅण्ड नाइट रायडर’ अनेक वर्षांपासून रंगभूमी गाजवत असून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्यास खरं उतरलं आहे. सोनाली कुलकर्णी अन् मिलिंद फाटक या जोडीच्या अफलातून अभिनयाने रसिकांना खिळवून ठेवणारं ‘व्हाइट लिली अ‍ॅण्ड नाइट रायडर’ हे नाटक आता दुबईच्या पृथ्वी फेस्टिव्हलमध्ये दाखवलं जाणार आहे. याच निमित्तानं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत सीएनएक्सने साधलेला हा मनमोकळा संवाद...

‘व्हाइट लिली अ‍ॅण्ड नाइट रायडर’ हे तुझे नाटक दुबईतील पृथ्वी फेस्टिव्हलमध्ये दाखविले जाणार आहे, तर तू किती एक्सायटेड आहेस?
पृथ्वी हाऊस हे खरं तर नाटकांचं घर आहे आणि पृथ्वी फेस्टिव्हल या वर्षी दुबईमध्ये होत असल्यानं मी खरंच आनंदी आहे. आमचं नाटक यंदाच्या पृथ्वी फेस्टिव्हलमध्ये दाखवलं जाणार असल्यानं मी अन् माझी संपूर्ण टीमच फार एक्सायटेड आहोत.
हे नाटक तू प्रोड्यूसदेखील करीत आहेस, याबद्दल काय सांगशील?
रसिकानं हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. ती गेल्यानंतर जेव्हा मला मिलिंदनं या नाटकासाठी विचारलं तेव्हा मी खरंच धजावले. रसिकाच्या स्पिरीटसाठी हे नाटक सुरू ठेवावं, असं सगळ्यांनाच वाटत असल्यानं ते मी प्रोड्यूस करण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर ते नाटक मनाला भिडेल असं लिहिलंय. त्याच्या संहितेवर माझं प्रेम होतं म्हणूनच मी अभिनय करण्याचा निर्णय घेतला अन् प्रोड्यूसदेखील केलं.
रसिका जोशी यांचं दिग्दर्शन अन् अभिनय या नाटकात पाहायला मिळाला होता. तुला नव्यानं पुन्हा करताना मनावर दडपण आलं होतं का?
रसिकानं या नाटकात अप्रतिमच काम केलं होतं. तिच्या अचानक जाण्यानं संपूर्ण टीमला धक्का बसला होता. आजही तिच्या आठवणीनं आमची टीम हळवी होते; परंतु जेव्हा मी अभिनय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला कधीच रसिकाशी कम्पेअर केलं नाही. मला माझ्या पद्धतीनं भूमिका साकारण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं. मला माझ्या टीमकडून खूप प्रेम मिळालं. त्यांनी सर्व गोष्टी संयमानं घेतल्या; त्यामुळे मला कधीच दडपण आलं नाही. मी माझ्यापरीनं या नाटकात भूमिका करत आहे.
देश-परदेशात या नाटकासाठी तू प्रयोग केलेस, तर प्रेक्षकांनी दिलेली कोणती दाद तुझ्या लक्षात राहिली आहे?
कोलकाता, दुबई, बँकॉक, यूके अशा अनेक ठिकाणी आम्ही प्रयोग केले आहेत. या सर्वच ठिकाणी आम्हाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षक अक्षरश: नाटक डोक्यावर घेत आहेत. नाटक संपल्यावरदेखील ५ मिनिटं तरी सभागृह टाळ्यांनी दुमदुमतं. हे सर्वच अनुभव अविस्मरणीय असतात. एके दिवशी नाटक संपल्यावर एक जोडपं माझ्याकडे आलं अन् माझ्यासमोरच तो माणूस त्याच्या बायकोला म्हणत होता, तूपण असंच करतेस तिच्यासारखी अन् दोघं चक्क आमच्यासमोर नाटकातील डायलॉग बोलू लागले. नाटकात कॉन्टॅ्रक्टचा उल्लेख आहे, तर एकदा एक व्यक्ती आमच्याकडे आली अन् म्हणाली, मला कॉन्ट्रॅक्टची कॉपी मिळेल का? असे अनेक मजेशीर अनुभव आम्हाला येत असतात.
या टीमसह काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
माझी टीम खरंच खूप छान आहे. आम्हाला एकत्र काम करताना फार मजा येतेय. या नाटकासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी एकत्र जातो, तेव्हा धमाल येते. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करण्यासाठी उत्सुक असतो. कधी प्रयोग करायला मिळतोय, याची आम्ही सर्व जण आतुरतेनं वाट पाहत असतो.

Web Title: An attempt to preserve itself from acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.