बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप द्यायला राज ठाकरेंची हजेरी, भावुक करणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:53 AM2024-10-15T11:53:56+5:302024-10-15T11:54:43+5:30

बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अतुल परचुरे यांच्या घरी पोहोचले. त्यांच्याबरोबर पत्नी शर्मिला ठाकरेदेखील होत्या.

atul parchure died due to cancer mns raj thackeray sharmila thackeray present at funeral video | बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप द्यायला राज ठाकरेंची हजेरी, भावुक करणारा व्हिडिओ

बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप द्यायला राज ठाकरेंची हजेरी, भावुक करणारा व्हिडिओ

Atul Parchure Passed Away:  मराठी अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं सोमवारी(१४ ऑक्टोबर) निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हा त्यांचं वजन झपाट्याने कमी झालं होतं. त्यांची स्थिती कोणालाच पाहवत नव्हती. तरी त्यांनी हिमतीने कॅन्सरवर मात केली आणि ते ठणठणीत बरे झाले. तब्येत सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. 

अतुल परचुरे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव दादर येथील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलं आहे. कलाविश्वातील सेलिब्रिटी अतुल परचुरेंच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी झाले आहेत. बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अतुल परचुरे यांच्या घरी पोहोचले. त्यांच्याबरोबर पत्नी शर्मिला ठाकरेदेखील होत्या. राज ठाकरेंनी अतुल परचुरेंच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. 


राज ठाकरे आणि अतुल परचुरे हे बालपणीचे मित्र होते. एकाच शाळेत ते शिकले होते. बालपणीच्या मित्राच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर राज ठाकरेंनादेखील धक्का बसला होता. अतुल परचुरेंच्या निधनानंतर राज ठाकरेंनी भावुक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. 

अतुल परचुरे रंगभूमीवर रमणारे अभिनेते होते. 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'प्रियतमा', 'वासूची सासू', 'आम्ही आणि आमचे बाप' या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली. शिवाय 'आर के लक्ष्मण की दुनिया', 'जागो मोहन प्यारे' सारख्या हलक्याफुलक्या मालिकेत काम केलं.  त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा  'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. कपिल शर्मा शोमध्येही त्यांनी सर्वांना खळखळून हसवलं. आता ते पुन्हा 'सूर्याची पिल्ले' या नाटकातून दमदार कमबॅक करणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 
 

Web Title: atul parchure died due to cancer mns raj thackeray sharmila thackeray present at funeral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.