"अतुल दादा...३ महिन्यांपूर्वीच तर आपण...", अभिनेत्याच्या निधनानंतर श्रेया बुगडेची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:22 AM2024-10-15T11:22:20+5:302024-10-15T11:23:02+5:30

अभिनेत्री श्रेया बुगडेला अतुल परचुरेंच्या निधनाने धक्का बसला आहे. तिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

atul parchure passed away due to cancer actress shreya bugade shared emotional post | "अतुल दादा...३ महिन्यांपूर्वीच तर आपण...", अभिनेत्याच्या निधनानंतर श्रेया बुगडेची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

"अतुल दादा...३ महिन्यांपूर्वीच तर आपण...", अभिनेत्याच्या निधनानंतर श्रेया बुगडेची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

Atul Parchure Passed Away:  मराठी अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हा त्यांचं वजन झपाट्याने कमी झालं होतं. त्यांची स्थिती कोणालाच पाहवत नव्हती. तरी त्यांनी हिमतीने कॅन्सरवर मात केली आणि ते ठणठणीत बरे झाले. तब्येत सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. 

अतुल परचुरेंच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडेला अतुल परचुरेंच्या निधनाने धक्का बसला आहे. तिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. "अतुल दादा...३ महिन्यांपूर्वीच आपल्या सेटवर आदित्य सरपोतदार यांच्या व्हॅनिटीमध्ये बसून आपण जेवलो होतो. तेच शेवटचं ठरलं. हे खूपच धक्कादायक आहे. तुझी खूप आठवण येईल...", असं श्रेयाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

अतुल परचुरे रंगभूमीवर रमणारे अभिनेते होते. 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'प्रियतमा', 'वासूची सासू', 'आम्ही आणि आमचे बाप' या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली. शिवाय 'आर के लक्ष्मण की दुनिया', 'जागो मोहन प्यारे' सारख्या हलक्याफुलक्या मालिकेत काम केलं.  त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा  'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. कपिल शर्मा शोमध्येही त्यांनी सर्वांना खळखळून हसवलं. आता ते पुन्हा 'सूर्याची पिल्ले' या नाटकातून दमदार कमबॅक करणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

Web Title: atul parchure passed away due to cancer actress shreya bugade shared emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.