अतुल परचुरे यांना अभिनेता नाही तर 'या' क्षेत्रात करायचे होते करिअर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 09:52 AM2024-10-15T09:52:27+5:302024-10-15T09:52:35+5:30
अतुल परचुरे यांना अभिनेता बनण्याअगोदर एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचे होते.
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अतुल परचुरे (Atul Parchure). त्यांचं काल १४ ऑक्टोबर रोजी निधन झालं आहे. अतुल परचुरे यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलं होतं. चित्रपट, मालिका, नाटक अशा माध्यमांमध्ये अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला. पण, अतुल परचुरे यांना अभिनेता बनण्याअगोदर एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचे होते.
अतुल परचुरे यांना कारकिर्दीत विनोदी अभिनेता म्हणून खास ओळख लाभली. मात्र, त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये वैविध्य आणि ताजेपणा असायचा. अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर अतुल परचुरे यांनी रंगभूमी, मालिका विश्व आणि चित्रपटसृष्टी गाजवत प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. पण, अतुल यांना अभिनेता व्हायचे नव्हते, तर त्यांची पहिली आवड ही वेगळीच होती. अतुल परचुरे यांना क्रिकेटपटू व्हायचे होते. पण, त्यांचं ते स्वप्न पुर्ण झालं नाही. क्रिकेटपटू झाले नसले तरी त्यांनी आपली क्रिकेटची आवड मनापासून जपली होती. क्रिकेटमधील बारकावे माहिती असल्याने ते क्रिकेटवर स्तंभलेखन करायचे. त्यांच्या स्तंभलेखनाला वाचकांची पसंती मिळाली होती. तर सुनील गावसकर हे त्यांचे आवडते खेळाडू होते.
अतुल परचुरे यांना कर्करोगाने ग्रासले होते. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आणि सुहृदांच्या साथीने अतुल परचुरे यांनी कर्करोगावर (Cancer disease) मात करुन नव्या इनिंगला सुरुवात केली होती. मात्र, काल अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यांचे असे अकाली जाणे कोणीच अपेक्षित धरलेलं होते. त्यांना जेव्हा कॅन्सर झाला हे समोर आले तेव्हाही सगळे असेच घाबरलेले मात्र त्या सगळ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केलेली. पण वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांच्यावर काळाने घाला घातला.