हसवता-हसवता रडवून गेल्या अतुलच्या आठवणी; एमआयजी क्लबमध्ये कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 06:22 AM2024-10-29T06:22:46+5:302024-10-29T06:23:57+5:30

संजय मोने यांनी ही शोकसभा नसल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट केले. आपल्याला आनंदाचे क्षण वेचायचे असल्याचे सांगत अतुल यांच्यासोबतच्या ग्रुपची गोष्ट त्यांनी सांगितली.

Atul Parchure's memories went from laughing to crying; Actors, Writers, Directors, Technicians pay homage at MIG Club | हसवता-हसवता रडवून गेल्या अतुलच्या आठवणी; एमआयजी क्लबमध्ये कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी वाहिली आदरांजली

हसवता-हसवता रडवून गेल्या अतुलच्या आठवणी; एमआयजी क्लबमध्ये कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी वाहिली आदरांजली

मुंबई : दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांच्या आठवणी त्यांच्या मित्र मंडळींनी जागवल्या. यावेळी शोक व्यक्त न करता त्यांच्या हसऱ्या आठवणी जागवता जागवता अनाहुतपणे अनेक कलाकारांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, तर बहुतेकांचा कंठ दाटून आला. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये ‘क्षण फक्त आनंदाचे’ हा कार्यक्रम झाला. यावेळी मनोरंजन विश्वातील कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी अतुल यांच्याविषयी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली तर अनेकांनी त्यांच्यासोबतचे क्षण जिवंत केले.

संजय मोने यांनी ही शोकसभा नसल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट केले. आपल्याला आनंदाचे क्षण वेचायचे असल्याचे सांगत अतुल यांच्यासोबतच्या ग्रुपची गोष्ट त्यांनी सांगितली. आमच्या ग्रुपमध्ये जो गैरहजर असायचा त्यांच्याविषयी आम्ही बोलायचो, असे ते म्हणाले. आज अतुल कुठेतरी गेलाय, तो येण्यापूर्वी त्याच्याविषयी बोलूया असे म्हणत मोने यांनी सभेला भावनिक सुरुवात केली.

‘’मला भेट हवी हो’’ या पहिल्या नाटकाचा दिग्दर्शक अतुल होता, असे सांगताना सुमीत राघवन यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्याच अवस्थेत सुमीत यांनी अतुल यांच्या आठवणी जागवल्या. ‘’विक्रम वेताळ’’ मालिकेमध्ये अतुल यांच्यासोबत काम केलेला अभिनेता मानव गोहिल अतुल यांनी खरेदी करायला सांगितलेले जॅकेट घालून आला होता. दिलीप जोशी यांनी ‘’क्या दिल ने कहा’’ या सिनेमाच्या निमित्ताने न्यूझीलंडमध्ये अतुल यांच्यासोबत घालवलेले दहा दिवस पुन्हा जगले.     

यावेळी प्रसिद्ध  कलावंत अजित भुरे म्हणाले, “अभिनय आणि बौद्धिक कौशल्य अतुलकडे होतेच, पण व्यवहारज्ञानही होते. अतुलने मैत्री आणि व्यवसाय यात कधी गल्लत केली नाही. कायम सुखासीन आयुष्य जगला. तो टेनिस खेळायचा. त्यामुळे तू रॅकेट खाली ठेवू नकोस असे मी त्याला म्हणालो, पण त्याने रॅकेट खाली ठेवले. आता सोनिया कुठे चुकते हे कोण सांगणार?” 

‘एक होता बजरबट्टू’
विनय येडेकर म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत घाबरणाऱ्या अतुलने मोठ्या धीराने आजाराचा सामना केला. आमच्या आवडीनिवडी समान होत्या. दोघांनाही क्रिकेट, मांसाहार आवडायचा. संजय नार्वेकर म्हणाले ‘आम्ही जगतो बेफाम’ या नाटकामुळे आम्ही जिवलग मित्र बनलो. मी त्याच्या कायम खोड्या काढायचो. त्याच्या स्कूटरवरून आम्ही संपूर्ण मुंबई फिरलो. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, जितेंद्र जोशी, मुक्ता बर्वे, भरत दाभोळकर, विजय केंकरे आणि अतुल यांच्यावर उपचार करणारे डॉ. पंडित आणि डॉ. व्यास यांनीही आठवणींना उजाळा दिला.

Web Title: Atul Parchure's memories went from laughing to crying; Actors, Writers, Directors, Technicians pay homage at MIG Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.