“शूटिंगवरून आल्यानंतर ऐश्वर्या आणि मी रात्री दीड तास ...”, अविनाश नारकरांनी सांगितली रिल्समागची मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 12:52 PM2024-07-15T12:52:31+5:302024-07-15T12:56:51+5:30
शूटिंग आणि व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत अविनाश-ऐश्वर्या नारकर ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवतात. याबाबतच अविनाश नारकर यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना भाष्य केलं आहे.
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहेत. केवळ अभिनयानेच नव्हे तर रील व्हिडिओनेही ते चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. शूटिंग आणि व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत ते ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवतात. याबाबतच अविनाश नारकर यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना भाष्य केलं आहे.
अविनाश-ऐश्वर्या अनेकदा ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवताना दिसतात. त्यांचे रील व्हिडिओ व्हायरलही होत असतात. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या या एव्हरग्रीन कपलची एनर्जी भल्याभल्यांना लाजवेल अशीच आहे. अविनाश नारकर यांनी नुकतीच डंका सिनेमाच्या निमित्ताने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "आम्ही रात्री शूटिंगवरून घरी आल्यानंतर दीड तास रील बनवतो. पण, तो दीड तास ज्यामध्ये आम्ही रिहर्सल करून रील बनवतो. त्या दीड तासात आम्ही खूप मजा करतो. आम्हाला यातून आनंद मिळतो. रात्रीचा हा दीड तास आम्ही खूप एन्जॉय करतो".
अनेकदा ऐश्वर्या आणि अविनाश यांना रील व्हिडिओमुळे ट्रोलही केलं जातं. या ट्रोलर्सलाही अविनाश यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. "लोक म्हणतात थिल्लरपणा करता. पण आपली नाच करायची पद्धतच ती आहे. आपण असेच दिलखुलास हावभाव करत नाच करतो. त्यामुळे आम्ही ते ठरवलंय आणि ते करणार", असं ते म्हणाले.
दरम्यान, अविनाश नारकर 'डंका' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, सयाजी शिंदे, रसिका सुनील, अक्षया गुरव, अविनाख नारकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. १९ जुलैला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.