ऑडिशनशिवाय मिळाला होता आयुषमान खुराणाला विकी डोनर, पहिल्या शॉर्टसाठी घेतले होते इतके रिटेक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 05:32 PM2019-09-24T17:32:20+5:302019-09-24T17:42:43+5:30
आयुषमानने विकी डोनर या चित्रपटाद्वारे त्याच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाच्या पहिल्या शॉर्टचे चित्रीकरण करताना त्याची अवस्था कशी झाली होती हे त्याने नुकतेच सांगितले.
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना सध्या यशाच्या शिखरावर आहे. नुकताच त्याचा ड्रीम गर्ल चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने करमवीर सिंगची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली आहे. मागील दोन वर्षांपासून आयुषमान सातत्याने हिट चित्रपट देत आहे. त्याची गणना आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये होते. आयुषमानने विकी डोनर या चित्रपटाद्वारे त्याच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याच्यासोबत यामी गौतम मुख्य भूमिकेत झळकली होती. त्याला त्याचा हा पहिला चित्रपट कशाप्रकारे मिळाला हे त्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे.
आयुषमाने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, विकी डोनर या चित्रपटाचे दिग्दर्शक शुजीत सरकार या चित्रपटासाठी एका पंजाबी मुलाच्या शोधात होते. त्यांनी मला एमटिव्हीवरील एका कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना पाहिले होते. त्यांनी कास्टिंग डायरेक्टर जोगी यांना माझ्याशी संपर्क साधायला सांगितला. मी त्यांना भेटायला गेलो असता मला पाहाताच मीच या चित्रपटातील भूमिकेसाठी योग्य असल्याची त्यांना जाणीव झाली आणि अशाप्रकारे या चित्रपटाच्या टीममध्ये माझी एंट्री झाली.
विकी डोनर या चित्रपटातील पहिल्या शॉर्टच्या अनुभवाविषयी आयुषमानने या मुलाखतीत सांगितले की, मला आजही माझा पहिला शॉर्ट चांगल्याप्रकारे आठवतो. मी बँकेत खाते उघडायला जातो आणि तिथे माझी यामीशी भेट होते, असा तो पहिला शॉर्ट होता. दिल्लीतील एका गेस्ट हाऊसमध्ये आम्ही या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राहात होता. याच गेस्ट हाऊसच्या गॅरेजमध्ये बँकेचा सेट उभारण्यात आला होता. माझा पहिला शॉर्ट असल्याने मी खूप नव्हर्स होतो. मी संवाद म्हणताना खूपच जोरात बोलत होतो. बहुधा मला सूत्रसंचालनची सवय असल्याने तसे होत होते. त्यामुळे शुजीत दा मला जरा हळू आवाजात बोल, असे सांगत होते. मला ते काही केल्या जमत नव्हते. पण तरीही अतिशय शांतपणे ते मला समजावत होते. केवळ या एका शॉर्टसाठी मी पाच ते सात रिटेक घेतले होते.