आयुष्यमान खुराणाचा ‘आर्टिकल 15’ वादात, दिग्दर्शकास धमकीचे फोन?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 01:36 PM2019-06-21T13:36:53+5:302019-06-21T13:37:28+5:30
अभिनेता आयुष्यमान खुराणा त्याच्या ‘आर्टिकल 15’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण तूर्तास या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला धमकीचे फोन येत असल्याची बातमी आहे.
2018 मध्ये अंधाधून, बधाई हो यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता आयुष्यमान खुराणा त्याच्या ‘आर्टिकल 15’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण तूर्तास या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला धमकीचे फोन व ई-मेल येत असल्याची बातमी आहे.
‘आर्टिकल 15’ ची कथा 2014 मध्ये उत्तरप्रदेशच्या बदायूंमध्ये झालेल्या बलात्कार व हत्येच्या घटनेवर आधारित आहे. या घटनेमध्ये दोन दलित अल्पवयीन मुलींवर गँगरेप करून नंतर हत्या केली गेली होती. या घटनेचे जगभर तीव्र पडसाद उमटले होते. मजुरीत केवळ तीन रुपये वाढवून मागणा-या दोन दलित मुलींचा बलात्कार करून हत्या केली जाते, या घटनेवर ‘आर्टिकल 15’आधारलेला आहे.
आयुष्यमान सध्या या चित्रपटाचे आक्रमक प्रमोशन करतोय. याचदरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांना वेगवेगळ्या लोकांकडून धमकीचे फोन कॉल्स व ई-मेल येत आहेत. चित्रपटाच्या कथानकामुळे या धमक्या दिल्या जात असल्याचे कळतेय.
ब्राह्मणांच्या एका संघटनेने आणि करणी सेनेने आधीच या चित्रपटाला ‘ब्राह्मणविरोधी’ म्हणत विरोध चालवला आहे. या चित्रपटात ब्राह्मण समुदायाला वाईट पद्धतीने सादर करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. अलीकडे आयुष्यमानने यावर खुलासा केला होता. आमचा चित्रपट कुठल्याही जातीविशेषाचे समर्थन करणारा नाही. आधी चित्रपट बघा आणि नंतर त्याला जज करा, असे आयुष्यमान म्हणाला होता.
‘आर्टिकल 15’ यात ईशा तलवार, कुमूद मिश्रा, मनोज पाहवा आणि सयानी गुप्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. आयुष्यमान यात एका पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. दोन दलित मुलींच्या हत्याप्रकरणाचा तपास करताना तो दिसणार आहे.