मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:32 PM2024-11-15T12:32:44+5:302024-11-15T12:35:22+5:30
आधी काका, वडील आणि नंतर नवजात बाळ; वर्षभरातच गायकाने पाहिले तीन मृत्यू, सांगितला कठीण काळ
बी प्राक हा बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आहे. 'तेरी मिट्टी', 'चांदनी', 'रांझा', 'ओ साकी साकी', 'जन्नत' अशी अनेक सुपरहिट गाणी त्याने बॉलिवूडला दिली आहेत. बॉलिवूड करिअरमध्ये यशाची उंची गाठलेल्या बी प्राकला मात्र वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील या प्रसंगांबाबत भाष्य केलं.
वर्षभरात बी प्राकने काका, वडील आणि त्याच्या नवजात बाळाला गमावलं. शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत गायकाने त्याच्या आयुष्यातील या प्रसंगांबद्दल सांगितलं. या मुलाखतीत बी प्राकला अध्यात्मकडे का वळलास? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बी प्राकने त्याच्या आयुष्यातील या घटनांबद्दल भाष्य केलं. २०२१ मध्ये काकाचं निधन झाल्याचं बी प्राकने सांगितलं. त्यानंतर वर्षभरातच त्याच्या वडिलांचंही निधन झालं. या घटनांनंतर लगेचच त्याच्या जन्मलेल्या बाळाचाही मृत्यू झाल्याचा गायकाने केला.
बी प्राक म्हणाला, "मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाला गमावलं तेव्हा खूप निगेटिव्ह झालो होतो. माझ्या बायकोला मी याबद्दल कसं सांगू हे मला कळत नव्हतं. मी तिला सांगायचो की तो एनआईसीयूमध्ये आहे. कारण, तिला हे सहन झालं नसतं. मला आयुष्यात सगळ्यात कठीण काय वाटलं असेल तर ते माझ्या बाळाचा मृतदेह उचलणं. मी माझ्या आईला बोलत होतो की हे आपण काय करतोय. आम्ही हॉस्पिटलमध्ये परत आलो तेव्हा माझ्या पत्नीकडे गेलो. तेव्हा माझी पत्नी मला म्हणाली की अंत्यसंस्कार करून आला का...आम्ही आयुष्यात सगळं काही गमावून बसलो. अजूनही तो माझ्या बरोबर आहे".
बी प्राकने २०१९ मध्ये लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर वर्षभरातच त्याच्या घरी पाळणा हलला. २०२० मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. २०२२ मध्ये तो दुसऱ्यांदा बाबा होणार होता. मात्र बाळाचा जन्म होताच त्याचा मृत्यू झाला.