ऐंशीच्या दशकातील बालकलाकार बेबी गुड्डू आता दिसते अशी, बॉलिवूडमधून आहे गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 03:42 PM2020-11-09T15:42:46+5:302020-11-09T15:43:17+5:30
बालकलाकार म्हणून बेबी गुड्डूने ३२ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
ऐंशीच्या दशकात बालकलाकार बेबी गुड्डू खूपच लोकप्रिय होती. तिच्या इतकी प्रसिद्धी इतर बालकलाकाराला मिळाली नाही. बालकलाकार म्हणून बेबी गुड्डूने ३२ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
बेबी गुड्डूचे खरे नाव शाहींदा बेग होते. ती निर्माते एमएम बेग यांची मुलगी होती. त्यामुळे अभिनय क्षेत्राशी तिचे नाते खूप जवळचे होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी बेबी गुड्डूने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. फार कमी वयात ती लोकप्रिय झाली.बेबी गुड्डूने औलाद, समंदर, घर परिवार, घर घर की कहाणी, नगीना, मूलझीम, गुरू यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
८० च्या दशकातील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये बेबी गुड्डूने काम केले. तिने त्या काळातील जवळपास सर्व सुपरस्टार्ससोबत काम केले. राजेश खन्ना बेबी गुड्डूचे खूप लाड करायचे.
बेबी गुड्डू मुलगी होती. पण तरीही अनेक चित्रपटांमध्ये तिने मुलाची भुमिका साकारली आहे. खुप कमी वयात ती अतिशय उत्तम अभिनय करत होती. म्हणून चित्रपटांमध्ये बालकलाकार बेबी गुड्डूलाच घेतले जायचे. ती मोठी झाल्यानंतर अभिनेत्री होईल असे सर्वांना वाटत होते. पण तसे झाले नाही. १९९१ साली रिलीज झालेला घर परिवार चित्रपट बेबी गुड्डूचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला.
बेबी गुड्डूने तिच्या शिक्षणावर लक्ष देण्यास सुरुवात केली. तिने विदेशात जाऊन तिचे शिक्षण पूर्ण केले. सध्या बेबी गुड्डू दुबईत आहे. तिने लग्न केले आहे आणि तिला मुले देखील आहेत.