बदलापूर अत्याचार प्रकरणी गौतमीची मार्मिक कविता, शाब्दिक फटकेबाजी करत व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 11:52 AM2024-08-23T11:52:45+5:302024-08-23T11:55:17+5:30
बदलापूर अत्याचार प्रकरणी अभिनेत्री गौतमी देशपांडेची सद्यस्थितीवर भाष्य करणारी कविता...
Gautami Deshpande On badlapur Case : देशात लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटना चिंतेत भर घालणाऱ्या आहेत. यानिमित्ताने गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच कोलकाता येथील निवासी डॉक्टरला अमानवी अत्याचाराला सामोरे जावे लागेल. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात निदर्शने करण्यात आली. तेच प्रकरण ताजं असताना काल-परवाच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात बालवाडीत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींचं लैगिंक शोषण केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. लोकांमध्ये असंतोषाचा उद्रेक झाला. या प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. शाळा प्रशासनाच्या काराभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
अशातच मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेने बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एका कवितेच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. अभिनेत्रीने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा कविता सादर करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
गौतमीची लक्ष वेधणारी कविता-
ये, तू आता काळजी घे बाई,
कारण तुला वाचवायला आता काही कृष्ण येणार नाही...॥ १॥
आता तुझी अब्रु झालीये खूप खूप स्वस्त,
आजुबाजुला दुर्योधन दुशा:सन झालेत मदमस्त,
तुझ्यासाठी आता कोणी भीम प्रतिज्ञा करणार नाही,
ये,आता तू काळजी घे बाई..॥ २॥
आता तुझ्या घरातही नाही होणार तुझी रक्षा,
तुला मिळतेय तुझ्याच स्त्रीत्वाची शिक्षा,
आता अधर्मासाठी कुणी महाभारत करणार नाही,
ये, तू आता काळजी घे बाई...॥३॥
तू शिकलीस, गेलीस विचारांनी पुढे,
पण नराधमांना कसे देणार नैतिकतेचे धडे,
आजही तुझ्या निऱ्यांना हात घालायला कुणी घाबरणार नाही,
आता, तू काळजी घे बाई...॥४॥
तू कपडे कोणतेही घाल,
त्यांच्या लेखू तू वस्रहीन,
अब्रू रक्षणासाठी कुणाकुणापाशी होशील लीन?
आता तुझा अर्जूनही हातात कायदा घेणार नाही,
आता, तू काळजी घे बाई...॥ ५॥
काळ पुढे गेला माणुस नाही,
धर्म बदलत गेला पण वृत्ती नाही,
आजही भर सभेत लाज तुझीच जाईल,
ये, आता तू काळजी घे बाई...॥ ६॥
सितेला नेली पळवून, तेव्हा राम आला होता धावून,
द्रौपदीच्या निऱ्यांना हात घातला तेव्हा पांडवांनी केला कौरवांचा नि: पात,
पण आज तुझा बलात्कार आणि तुझा पुरुष मात्र कायद्यापुढे लाचार,
तुला आता देवाचीही साछ राहिली नाही,
तू आता काळजी घे बाई...॥ ७॥
आता वेळ बदलायची,
स्वत: हून महाभारतात उतरायची,
दुर्योधनाच्या मांडी आता स्वत: हून फोडायची,
आता केस बांध, युद्धात उतर बाई,
कारण आता तुला वाचवायला कृष्ण काही येणार नाही...॥ ८॥
शिवाय अभिनेत्री गौतमी देशपांडेने या कवितेच्या माध्यमातून प्रशासनाला शाब्दिक चिमटा काढला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये महिलांच्या सुरक्षेविषयी सवाल देखील उपस्थित केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहलंय, "गेले काही दिवस भयंकर चालू आहे सगळं. त्यावर काहीतरी लिहावसं वाटलं; स्त्रीचा अपमान झाला आणि महाभारत घडलं. पण आता काय?" गौतमीची महिला सक्षमीकरणाची बाजू मांडणाऱ्या या व्हायरल व्हिडीओचं नेटकऱ्यांनीही समर्थन केलं आहे.