बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप; थेट सवाल करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 05:25 PM2024-08-20T17:25:26+5:302024-08-20T17:29:17+5:30
बदलापूर येथील एका शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
Mrunmayee Deshpande Post On Badlapur Case :बदलापूर येथील एका शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आज संतप्त बदलापूरकरांनी शाळा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला घाम फोडला. शाळा प्रशासनाने दाखवलेला बेजबाबदार पालकांना असह्य झाल्याने त्यांनी आज बदलापूर बंदची हाक दिली. दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणी आता वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनेही या घटनेचा निषेध नोंदवत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीच्या माध्यमातून तिने प्रशासनाला सवाल केला आहे. माणूस म्हणून नक्की कुठे जातो आहोत आपण ?असं लिहित तिने प्रश्न उपस्थित केला आहे. # बदलापूर असा टॅग देत मृण्मयीने ही स्टोरी पोस्ट केली आहे.
बदलापूर शहरात घडलेल्या घटनेनंतर आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर नेटकऱ्यांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्नांची सरबत्ती केली आहे. त्यामुळे या प्रकरणानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे शिवाय आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईनजीक बदलापूर शहरात संस्कृतीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेमध्ये ४ वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ ते १३ ऑगस्ट ला हा प्रकार घडला होता. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला आहे. दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.